रेशनिंगचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात
By Admin | Updated: September 4, 2014 00:04 IST2014-09-03T22:45:14+5:302014-09-04T00:04:15+5:30
रेशनिंगचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात

रेशनिंगचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात
वणी : महाराष्ट्रातून गुजरातला रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेण्याचा आरोप असणारे दोन संशयित न्यायालयाला शरण आल्याने न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. वणी पोलिसांनी २७ आॅगस्ट रोजी गुजरातला जाणारा ट्रक (एमएच ४१ जी ५५५६) पकडून ४७० कट्टे रेशनचा तांदूळ जप्त केला होता. या कारवाईत १०,१३,८५० रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन ट्रकचालक दादाजी दगा देसले (रा. गोराणे, सटाणा), अभिमन सुकदेव भामरे (रा. आनंदपूर, सटाणा) व जीएनआर ट्रान्स्पोर्टचे राजेशभाई शर्मा (रा. नाशिक) या तिघांवर जीवनाश्यक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादाजी देसले याला अटक करण्यात आली होती. त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती, तर अभिमन भामरे व राजेशभाई शर्मा हे दोघे फरार झालेले ते न्यायालयात शरण आले व न्यायालयाने युक्तिवाद ऐकून त्यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणाच्या तळाशी जाणे पोलिसांना आवश्यक असल्याने या दोघांच्या चौकशीसाठी न्यायालयीन प्रक्रिया व परवानगीची पूर्तता करावी लागणार
आहे.
वणी पोलिसांच्या ताब्यात असणारा तांदूळ प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावा यासाठी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले असून, प्रांताधिकाऱ्यांच्या त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. (वार्ताहर)
राजे फ्रेंड गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा
पांडाणे : येथील राजे फ्रेंड सर्कल गणपती मित्रमंडळातर्फे विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. फ्रेंड सर्कल मित्रमंडळातर्फे किशोरी वयातील मुला-मुलींसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत वय ६ ते १४ वर्षापर्यंतच्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन सचिन कड यांनी केले.
(वार्ताहर)