रेशन दुकानांची होणार वर्गवारी
By Admin | Updated: October 14, 2015 23:48 IST2015-10-14T23:47:34+5:302015-10-14T23:48:49+5:30
४७ दुकानांवर संक्रांत : दोन महिन्यांत तपासणी

रेशन दुकानांची होणार वर्गवारी
नाशिक : जिल्ह्यातील रेशन दुकानांची उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत सुरू असलेली तपासणी मोहीम यापुढे कायमस्वरूपी राबविण्यात येणार असून, दर दोन महिन्यांनी अचानक तपासणी करून रेशन दुकानांची वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या तपासणीत ४७ दुकाने दोषी आढळले असून, त्यात एकट्या सुरगाणा तालुक्यातील २७ दुकानांचा समावेश आहे. ही सर्व दोषी दुकाने रद्द करण्यात येऊन त्या दुकानांशी संलग्न असलेल्या शिधापत्रिकाधारकांना पर्यायी रेशन दुकानात जोडण्यात येणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. यापुढे दर दोन महिन्यांतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत अचानक रेशन दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, प्रत्येक दुकानाची तपासणी करून ‘अबकड’ अशी वर्गवारी करण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही दोषमुक्त दुकानाला ‘अ’ दर्जा तर किरकोळ दोषी असलेल्यांना ‘ब’ दर्जा देण्यात येणार आहे. गंभीर स्वरूपांना ‘क’ तर अति गंभीर दुकानांना ‘ड’ दर्जात वर्ग करण्यात येऊन ते थेट रद्द करण्यात येणार आहे. दर दोन महिन्यांनी केल्या जाणाऱ्या तपासणीत या दुकानांच्या वर्गवारीचाही आढावा घेण्यात येऊन त्यांच्यात सुधारणा न झाल्यास व पुन्हा दोष आढळल्यास खालच्या दर्जात त्याची वर्गवारी करण्यात येईल तर उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे. या वर्गवारीच्या प्रक्रियेमुळे रेशन दुकानदारांना सुधारण्याची संधी मिळणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.