रेशन दुकानदारांना धान्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: March 21, 2015 23:29 IST2015-03-21T23:28:53+5:302015-03-21T23:29:20+5:30
रेशन दुकानदारांना धान्याची प्रतीक्षा

रेशन दुकानदारांना धान्याची प्रतीक्षा
नाशिक : मार्च महिन्यात मंजूर धान्यापैकी निम्मेच धान्य देणाऱ्या पुरवठा खात्याने गुढीपाडव्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या धान्यातून उर्वरित धान्य देण्याची घोषणा हवेत विरली असून, शहरातील सुमारे ९० दुकानदारांना आजपावेतो धान्याचा एक कणही मिळालेला नाही, तर ग्रामीण भागातही काही तालुक्यांमध्ये शंभर टक्के धान्य पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. रेशन दुकानात धान्यच नसल्याने गुढीपाडव्याला चांगले करून खाण्याच्या गोरगरिबांच्या मनसुब्यावर पाणी फिरले गेले आहे.
सुरगाणा येथील धान्य घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याचा परिणाम मार्च महिन्यात रेशन दुकानदारांना वाटप करावयाच्या धान्यावर झाला. घोटाळ्यातील धान्याची तूट भरून काढण्यासाठी प्रत्येक तालुक्याला फक्त ५० ते ५५ टक्केच धान्य वितरित करण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने त्यावर सारवासारव करीत माथाडी कामगारांच्या संपाचे कारण पुढे करून धान्य देण्यास अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, सर्व रेशन दुकानदारांना शंभर टक्के धान्य २० मार्चनंतर देण्याचेही जाहीर केले होते. असे असतानाही मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सुमारे ९० दुकानदारांना संपूर्ण मार्च महिन्यात धान्याचा एक कणही मिळालेला नाही, तर ग्रामीण भागातील आठ तालुक्यांमध्येही पुरेसे धान्य पोहोचलेले नाही. धान्याच्या तुटवड्यामुळे रेशन दुकानदारांना त्याचा फटका बसला असून, शासनाने धान्य उपलब्ध करून दिले; परंतु दुकानदार ते देत नाहीत, अशी भावना शिधापत्रिकाधारकांमध्ये झाली आहे. शहरी भागात दारिद्र्य रेषेखालील व अन्नसुरक्षा कायद्याने पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या अधिक असून, त्यांच्यात रेशनच्या धान्याबाबत जागरूकता अधिक आहे. ज्या दुकानांना धान्यच मिळालेले नाही, त्यांना शिधापत्रिकाधारक भंडावून सोडत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. गुढीपाडव्याच्या सणापूर्वीच पुरवठा खात्याने धान्य देण्याचे कबूल केले; परंतु त्याची पूर्तता केली नसल्याची तक्रार आहे. (प्रतिनिधी)