रेशन दुकानदारांचा संप मागे
By Admin | Updated: August 9, 2016 00:55 IST2016-08-09T00:55:23+5:302016-08-09T00:55:33+5:30
रेशन दुकानदारांचा संप मागे

रेशन दुकानदारांचा संप मागे
नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून राज्यव्यापी संपात सहभागी असलेल्या रेशन दुकानदारांनी सोमवारी अचानक संप मागे घेत, धान्य उचलण्यासाठी चलने भरली तर काहींनी दुकानेही सुरू करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण केले.
रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेशन दुकानदारांच्या संघटनेने १ आॅगस्टपासून राज्यव्यापी संप पुकारला असताना दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे नदी, नालेकाठावरील शेकडो कुटुंबे बाधित झाली. अनेकांचे संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून रेशनवरील शिधा उपलब्ध करून देण्यासाठी रेशन दुकानदारांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यासाठी पुरवठा अधिकारी व उपआयुक्तांनी बैठकाही घेतल्या, परंतु रेशन दुकानदारांनी संपावर राहण्याचा ठाम निर्णय घेतला. त्यामुळे पुरवठा खात्याने सर्व दुकानदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यानंतर रेशन दुकानदारांनी नांगी टाकत दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. शहरातील दुकानदारांनी ही तयारी दर्शविलेली असताना, त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुकानदारांनीही स्वत: संप मागे घेत, चलने भरली.
सोमवारी पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या तीन तालुक्यातील दुकानदार वगळता सुमारे ७११ दुकानदारांनी चलने भरली, तर शहरातीलही १३७ दुकानदार माल उचलण्यास राजी झाले. त्यामुळे सकाळी ज्यांनी चलने भरली, त्यांनी दुपारी धान्य घेत दुकानेही उघडी करून वितरण सुरू केले. (प्रतिनिधी)