केंद्रीय समितीमार्फत रेशन धान्याची तपासणी
By Admin | Updated: November 17, 2015 22:36 IST2015-11-17T22:35:03+5:302015-11-17T22:36:11+5:30
गुदामे, रेशन दुकानांना भेट : गुणवत्ता, दर्जाला प्राधान्य

केंद्रीय समितीमार्फत रेशन धान्याची तपासणी
नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडून जिल्ह्यातील शासकीय धान्य गुदामे व रेशन दुकानांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्यासाठी पुणे येथील गुणवत्ता व दर्जा नियंत्रक विभागाची समिती चार दिवसांसाठी नाशिक दौऱ्यावर आली आहे.
गुणवत्ता व दर्जा नियंत्रक विभागाचे विभागीय उपसंचालक प्रभाकर भट व त्यांचे सहकारी वर्मा अशी द्विसदस्यीय समितीने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस मनमाड येथील अन्नधान्य महामंडळाच्या गुदामातील धान्याच्या दर्जाची तपासणी केली, त्यासाठी काही नमुनेही त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर मनमाडच्याच शासकीय धान्य गुदामातीलही धान्याची गुणवत्ता तपासून अन्नधान्य महामंडळाच्या गुदामातील धान्याशी त्याची खात्री केली. यापूर्वी अन्नधान्य महामंडळातून निकृष्ट दर्जाचे धान्य प्राप्त होत असल्याच्या तक्रारी थेट केंद्र सरकारच्या कृषी खात्याकडे करण्यात आल्या होत्या, त्याची दखल घेत अन्नधान्य महामंडळातील धान्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या समितीने दोन दिवस मनमाडमध्ये तपासणी केल्यानंतर बुधवारी नाशिक शहरातील अंबड व नाशिकरोड येथील शासकीय धान्य गुदामातील धान्याचा दर्जा ते तपासणार आहेत. त्याचा अहवाल थेट केंद्र सरकारला दिला जाईल. सध्या रेशनमधून फक्त गहू व तांदूळ या दोनच धान्यांचे वाटप केले जाते. त्यातही नागरिकांची ओरड गव्हाच्या दर्जाबद्दलच नेहमी असते.
जनावरांच्या खाण्यायोग्यदेखील नसलेले गहू शिधापत्रिकाधारकांना दिले जातात, अशी तक्रार आहे. समितीच्या तपासणीने यापुढे गुणवत्तेचे धान्य मिळेल, अशी आशा आहे.