अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी शिधापत्रिका मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:44+5:302021-09-04T04:18:44+5:30
नाशिक : अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना शिधापत्रिका तसेच जात प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे योजनांपासून वंचित राहावे लागते. ही बाब विचारात ...

अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी शिधापत्रिका मोहीम
नाशिक : अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना शिधापत्रिका तसेच जात प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे योजनांपासून वंचित राहावे लागते. ही बाब विचारात घेऊन आता या घटकातील गरजूंना विनामूल्य शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी संपूर्ण महिनाभर विशेष मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली.
आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका मिळण्यासाठी आवश्यक शुल्क हे न्युक्लिअस बजेट या योजनेतून प्राप्त झालेले आहे. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांच्या स्तरावरुन संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना संबंधित शुल्क प्रदान करण्यात आले असल्याने लाभधारकांना विनामूल्य जातप्रमाणपत्र तसेच शिधापत्रिका मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव परिस्थितीमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावात बदल करणे, शिधापत्रिका विभक्त करणे यासाठी लागणारे शुल्क शासकीय विशेष मोहिमेंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक या कार्यालयाकडून प्रदान करण्यात येणार आहे. ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अद्यापपर्यंत शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र प्राप्त झाल्या नाहीत, अशा कुटुंबांनी संबंधित तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन मीना यांनी केले आहे.