‘पंचनादा’त रसिक तल्लीन
By Admin | Updated: October 4, 2015 23:56 IST2015-10-04T23:55:28+5:302015-10-04T23:56:54+5:30
स्वरविष्काराची पर्वणी : गुरुकृपा तबला अकादमीचा कार्यक्रम

‘पंचनादा’त रसिक तल्लीन
नाशिक : कधी तबल्याचा नाद, कधी बासरीचे, संवादिनीचे स्वर, तर कधी भावविभोर करणारे गायन अशा विविध कलाविष्कारांनी ‘पंचनाद’ कार्यक्रम बहरला आणि त्यात रसिक तल्लीन झाले.
श्री गुरुकृपा तबला अकादमी व विश्वास बॅँक यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पं. श्रीकांत ठकार, पं. अविराज तायडे, पं. मकरंद हिंगणे, पं. विजय हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम दोन सत्रांत झाला. प्रथम सत्रात हर्ष, कुणाल, आदित्य यांच्या तबला सहवादनाने प्रथम पुष्प, तर दुसरे पुष्प विश्व, निमिष, अद्वैत, आदित्य, अथर्व, कुणाल, संगीत, आदित्य यांच्या तबला सहवादनाने गुंफण्यात आले. वैदेही, साक्षी, मृणाल व अभिषेक यांच्या तबला सहवादनाने तिसरे पुष्प रंगले. अभिषेक, आदित्य, प्रद्युम्न आणि द्वारकेश यांचे तबला सहवादन व मिलिंद शेवडे यांच्या बासरीवादनाने या सत्राचा समारोप झाला.
पं. जयंत नाईक यांचा शिष्य निमिष घोलप याच्या एकल तबलावादनाने दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला. पं. अजय पोहनकर यांचे शिष्य पं. धनंजय जोशी यांनी यमन रागात बडा ख्याल व नंतर बागेश्री रागात सुरेल गायकी सादर केली. पं. जयंत नाईक यांनी तबल्यावर साथ केली. नंतर आशिष राणे यांचे तबलावादनही रंगले. ‘रंग त्रितालाचे’ या विशिष्ट सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
ओंकार, आदित्य, बल्लाळ, व्यंकटेश, प्रद्युम्न, निमिष, अनिरुद्ध, उमेश यांनी फक्त तबलाच नव्हे, पाश्चात्त्य वाद्य जेंबे व ड्रमचेही लयबद्ध व तालबद्ध सादरीकरण करीत गुरूंना मानवंदना दिली. ज्ञानेश्वर कासार, दिव्या जोशी-रानडे, सागर कुलकर्णी यांनी संवादिनीची संगीतसाथ केली. (प्रतिनिधी)