राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: January 10, 2017 01:41 IST2017-01-10T01:41:17+5:302017-01-10T01:41:31+5:30

घोषणाबाजी : सामान्य जनतेचा त्रास कमी करा

Rashtravadi Congress's Dare movement | राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे धरणे आंदोलन

 नाशिक : केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर करताना, त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पूर्वतयारी केली नाही, परिणामी करोडो लोकांना त्याचा त्रास सोसावा लागत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून शासनाचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने नोटाबंदीवरून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याचा भाग म्हणून सोमवारी सकाळी आमदार जयंत जाधव व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना गेल्या दोन महिन्यांपासून नोटबंदीमुळे सामान्य जनता, व्यावसायिक, गृहिणी, हातमजूर अशा साऱ्या घटकाला होत असलेल्या त्रासाचे अनुभव कथन करून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, बॅँकेतून पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याना बी-बियाणे, खते व औषधे खरेदी करणे अवघड झाले असून, शेतमालाचे भाव कोसळले आहेत. रोखीचे व्यवहार ठप्प होवून बेरोजगारीत वाढ झाली आहे. सहकारी बॅँका, पतसंस्थांवर निर्बंध घातल्याने अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. गृहिणींना घर कसे चालवावे हा प्रश्न पडला, तर व्यापारीवर्गाचे खेळते भांडवलही बंद झालेले आहे. नोटाबंदीमुळे आजवर शंभराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा परिस्थितीत केंद्र सरकारने परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस नाना महाले, संजय खैरनार, दत्ता पाटील, अनिल परदेशी, मुख्तार शेख, पद्माकर पाटील, पद्मा वाघ, राहुल सोनवणे, भरत जाधव, वैभव देवरे, शंकर मोकळ, किरण पानकर, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, सुनील दातीर, संदीप महाले, सुरेखा निमसे यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rashtravadi Congress's Dare movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.