जोरण परिसरात तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: April 3, 2016 23:01 IST2016-04-03T22:54:59+5:302016-04-03T23:01:54+5:30
जोरण परिसरात तीव्र पाणीटंचाई

जोरण परिसरात तीव्र पाणीटंचाई
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे खोलवर जात असल्याची पाण्याची पातळी तसेच उन्हाळ्यात भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झाला असून, विहिरींनी मात्र तळ गाठले आहेत. त्यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. अपुऱ्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात नदी, नाले, लहान मोठे बंधारे, केटीविहीर यात पुरेशा पाण्याचा साठा झाला नाही तसेच अजून उन्हाळ्याचे दोन अडीच महिने शिल्लक असतानाच परिसरातील विहिरी मात्र कोरड्याठाक झाल्याचे भयानक चित्र बळीराजास भेडसावत आहे. सध्या फळबागांचे क्षेत्र संपूर्ण कांद्याने व्यापले असून, सिंचन पद्धतीऐवजी फ्लड पद्धतीमुळे प्रत्येक शेतकऱ्यास जास्त पाण्याची गरज भासू लागली आहे. पावसाचे पाणी अडविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च येतो; मात्र नेहमीप्रमाणे पाझरत येणाऱ्या निधीमधून स्वत:ची पोळी भाजून उरलेल्या निधीमधून ठेकेदारांकडून तयार करण्यात आलेले धरण, लहान मोठे केटीवेअर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाझरून कोरडे होतात हे कळतदेखील नाही. एकूणच नैसर्गिक पाणीटंचाई असो, प्रत्येक वेळी बळी जातो तो फक्त बळीराजाचा. सुरुवातीस परिसरात मुबलक पाणी होते. त्याच पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी कांदा, टमाटे, गहू आदि पिकांची लागवड केली होती; मात्र अचानक उष्णता वाढल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून, परिसरातील पिके वाया जाण्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य दिसून येत आहे़