खंडणीखोर दलालास अटक
By Admin | Updated: April 20, 2017 00:53 IST2017-04-20T00:53:33+5:302017-04-20T00:53:44+5:30
नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़

खंडणीखोर दलालास अटक
नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गायकवाडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील सी़ मेघ इंडस्ट्रीचे मालक भरत यशवंत शहा यांनी कंपनीच्या व्यवसायाकरिता गांधीनगर (गुजरात) येथील पी. सी. इंडस्ट्रिजचे मालक मयूर शहा यांच्याकडून स्विच गिअरचे २० लाख रुपये किमतीचे मटेरिअल खरेदी केले होते. या पैशासाठी मयूर शहा यांचा तगादा सुरू असतानाच त्यांच्या नावाने संशयित हेमंत गायकवाड याने टक्केवारीने पैसे वसूल करण्याचे काम घेतले़ विशेष म्हणजे या वसुलीसाठी तो दहा टक्के स्वत:चे कमिशन घेऊन जादा पैसे उकळत होता़
संशयित गायकवाड याने प्रथम मयूर शहा यांच्याकरिता तीन लाखांचा धनादेश आणि स्वत:चे कमिशन ३० हजार रुपये वसूल केले़ यांनतर उर्वरित रकमेची मागणी करून पैसे न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली़ तसेच १८ एप्रिल रोजी पुन्हा मयूर शहा यांच्या नावाने तीन लाख रुपये व खंडणीचे २५ हजार गंगापूररोडवर घेताच गुन्हे शाखेच्या युनिट एकने गायकवाडला रंगेहाथ पकडले़ दरम्यान, संशयित गायकवाड यास न्यायालयाात हजर केले असता २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल व उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहायक निरीक्षक दीपक गिरमे, जमादार पळशीकर, हवालदार सदावर्ते, बाळासाहेब दोंदे, नाईक शरद सोनवणे, मोहन देशमुख, विशाल काठे, स्वप्निल जुंद्रे, श्रीकांत साळवे, नीलेश भोईर, निर्मला हाके, संजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)