मायको फोरमतर्फे रांगोळी प्रदर्शन
By Admin | Updated: September 12, 2016 01:37 IST2016-09-12T01:35:53+5:302016-09-12T01:37:47+5:30
प्रमोद आर्वी यांनी रांगोळीतून दिला सामाजिक संदेश

मायको फोरमतर्फे रांगोळी प्रदर्शन
नाशिक : सेव्ह अर्थ, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळजन्य परिस्थिती, मुलगी वाचवा, अन्न वाया घालवू नका हे आणि असे विविध संदेश देणाऱ्या रांगोळ्या कलाकार प्रमोद आर्वी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रांगोळी प्रदर्शनात रेखाटल्या आहेत. चित्रकलेचे त्याचप्रमाणे रांगोळीचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता बोटांच्या अलगद स्पर्शाने मालेगाव (संगमेश्वर) येथील कलाकार प्रमोद आर्वी यांनी रांगोळीच्या उत्कृ ष्ट कलाकृती साकारल्या आहेत.
मायको एम्प्लॉईज फोरम यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी कार्यशाळा तसेच रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १०) अश्विननगर येथील मायको फोरम संस्थेच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनाचे नगरसेविका शीतल भामरे आणि संजय भामरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनांतर्गत रांगोळी कलाकार प्रमोद आर्वी यांनी रेखाटलेल्या विविध रांगोळ्या या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत. तसेच संस्कार भारती, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून कसे साकाराचे याबाबतही आर्वी कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनात ११ कलाकारांच्या मार्फत २५ ते ३० किलो रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. या रांगोळ्या साकारण्यासाठी रेणूका पाटणकर, मोनाली बच्छाव, श्रध्दा बागुल, गायत्री निकम, मीनल जाधव, पुजा बच्छाव, राधिका महाले, दीपाली देशमुख, प्रिया मोरे, मोहिनी इनामदार आदि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नाशिकसह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर याठिकाणी रांगोळी स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर केली आहे. साताऱ्याला झालेल्या स्पर्धांमध्ये दोन वेळा सहभागी होत पाचवा तर सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. नाशिकमध्ये फारशी माहिती नसलेल्या लेक रंग आणि पिग्मेंट रंगांपासून रांगोळी रेखाटण्यात आर्वी यांचा विशेष हातखंडा आहे. रांगोळी रेखाटनातून निसर्गचित्र, व्यक्तिचित्र तसेच विशिष्ट विषयावर आधारित रांगोळी रेखाटून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आर्वी करत असतात.
गुरुवारी (दि. १५) सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी भगवान सोनवणे, मोहनदास पाटील, प्रशांत लोणारी, सतीश राजकोर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)