प्रभू श्रीराम वनवास काळात या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे अशी लोकभावना. म्हणून किल्ल्याला रामशेज हे नाव पडले. मराठा साम्राज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. हा किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन होते. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड. तो तेथून आठ कोस अंतरावर आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांची कुशल युद्धनीती, किल्लेदार व अवघ्या सहाशे मावळ्यांनी हा किल्ला अजिंक्य ठेवला. असा रामशेज किल्ला नाशिक-पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्त्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. नाशिकच्या सीबीएस बसस्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस.टी. आशेवाडी गावाच्या फाट्यावर थांबते. तिथे उतरून आशेवाडी गावात पोहोचले की रामशेज किल्ल्यावर चढाई करता येते. रामशेजचा किल्ला समुद्रसपाटीपासून ३२७० मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची जास्त नाही. गावातून गडावर पोहोचण्यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. थोडे पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. गडावर शिरताना गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे एक टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या थेट गडावर जातात. त्यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. रामशेज किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. मात्र गडावर पाण्याच्या टाक्या असून, वाड्याचे जोते आहेत. तसेच गडावरून गंजकरंग, वाघेरा, देहेरे व सातमाळा रांग बघता येते. आजही अनेक शिवभक्त किल्ल्यावर नियमित साफसफाई, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवतात. पर्यटकांसाठी रामशेज किल्ला नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.