युवतींची छेडछाड; आवार असुरक्षित
By Admin | Updated: March 16, 2016 23:01 IST2016-03-16T22:52:22+5:302016-03-16T23:01:46+5:30
पालक संतप्त : झोपडपट्टीच्या टवाळखोरांचा उपद्रव

युवतींची छेडछाड; आवार असुरक्षित
नाशिक : शहरातील महाविद्यालयांचा परिसर असुरक्षित झाला असून, झोपडपट्टी परिसरातील टवाळखोरांचा वाहनतळ अड्डा बनत चालला असून, युवतींची छेडछाड होण्याचे प्रकार राजरोसपणे घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशीच एक घटना शहरातील एका महाविद्यालयाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी तरुणींनी संशयित टवाळखोरांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
शहरातील महाविद्यालयांमध्ये जरी खासगी सुरक्षाव्यवस्था असली तरी झोपडपट्टी परिसरातील टवाळखोरांचा नेहमीच वावर असल्याने महाविद्यालयीन युवतींसाठी आवार असुरक्षित होत आहे. वाहनतळांमध्ये तासन्तास टवाळखोर ठिय्या मांडून बसतात. यावेळी युवती वाहनतळांमध्ये आल्या असता टवाळखोर त्यांची कोणत्या ना कोणत्या कारणावरून छेड काढत असल्याने युवतींच्या नाकीनव आले आहे. यामुळे पालकवर्गांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील सर्वच महाविद्यालये नामवंत संस्थांचे असून, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून खासगी सुरक्षारक्षकही तैनात केले आहे; मात्र तरीदेखील महाविद्यालयांचा परिसराचा विस्तार बघता सुरक्षाव्यवस्था तोकडी पडत
असल्याने टवाळखोरांचे फावले
आहे. रोडरोमिओंचादेखील महाविद्यालयांच्या परिसरात ‘पट्टा’ वाढल्याने असुरक्षित वातावरण युवतींमध्ये तयार झाले आहे. याबाबत अनेकदा सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यांच्या पोलीस गस्त पथकाला महाविद्यालयांच्या परिसरात काही युवतींना मैत्री व प्रेमासाठी केली जाणारी बळजबरी व त्यामधून दोन गटांमध्ये होणारे वादविवाद, हाणामाऱ्यांसारखे प्रकार नियंत्रणात आणावे लागतात. त्यामुळे पोलिसांनीदेखील महाविद्यालयांच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अंतर्गत सुरक्षा कडेकोट करण्याची गरज असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)