रामकुंड पाण्याने भरले
By Admin | Updated: April 9, 2016 01:07 IST2016-04-09T01:07:08+5:302016-04-09T01:07:08+5:30
पाडव्याचे स्नान : टॅँकरचालकांचा प्रतिसाद; भाविकांची गर्दी जेमतेमच

रामकुंड पाण्याने भरले
नाशिक : कोरडे पडलेले रामकुंड पाण्याने भरण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील खासगी टॅँकरचालकांनी प्रतिसाद दिला आणि बऱ्याच दिवसांनंतर रामकुंड पाण्याने भरले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांनी स्नान केले, परंतु गर्दी तशी जेमतेमच होती.
गेल्या अनेक दिवसांपासून गोदापात्रात पाणी नसल्याने रामकुंडही कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनाही स्नान न करताच माघारी परतावे लागत होते. धार्मिक विधी, अस्थि विसर्जनासाठीही अडथळे निर्माण झाले. त्यामुळे पुरोहित संघानेही रामकुंडात पाणी भरण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. दरम्यान, महापौर अशोक मुर्तडक यांनी गुरुवारी रामकुंडाची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. शिवाय, रामकुंडात खासगी टॅँकरचालकांनी एकेक टॅँकर पाणी आणून टाकावे, असे आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी रात्रीच काही टॅँकरचालकांनी खासगी विहिरींमधून टॅँकरने पाणी रामकुंडात आणून ओतले तर शुक्रवारी सकाळपासून सुमारे ४० ते ५० टॅँकरने पाणी आणण्यात आले. याशिवाय महापालिकेचे काही कंत्राटदार यांनीही आपले योगदान दिले तसेच महापालिकेच्याही टॅँकरने पाणी आणून टाकण्यात आले. काही पाणी गांधीतलावातून उचलण्यात आले. त्यामुळे रामकुंड बऱ्याच दिवसांनी पाण्याने भरले. पाण्यामुळे भाविकांना पाडव्याच्या मुहूर्तावर स्नान केले. मात्र, रामकुंडातील पाण्याची स्थिती माहिती असल्याने स्थानिकांनी न जाणेच पसंत केले.