रामघाटावर साकारतेय चित्ररूपी रामायण

By Admin | Updated: August 9, 2015 23:04 IST2015-08-09T23:03:47+5:302015-08-09T23:04:20+5:30

पहिलाच प्रयोग : वॉटरप्रूफ अ‍ॅक्रॅलिक रंगात रंगणार गोदाघाट

The Ramayana, pictured in Ramghat | रामघाटावर साकारतेय चित्ररूपी रामायण

रामघाटावर साकारतेय चित्ररूपी रामायण

नाशिक : श्रीरामाच्या वास्तव्याचे दाखले असणाऱ्या नाशिकमध्ये सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांसमोर संपूर्ण रामायण चित्ररूपात साकारण्याचे शिवधनुष्य नाशिकच्या कला परिवाराने उचलले असून, १५० व्यक्तिरेखांचा समावेश असलेले हे महाचित्र बनविण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
नाशिकच्या अमरधामपासून ते कन्नमवार पुलापर्यंतच्या घाटाजवळ बांधलेल्या भिंतीवर रामायणाचे हे महाचित्र साकारले जात आहे. ९५० फूट लांब भिंतीवर सुमारे २० फूट उंच आकारात हे महाचित्र रंगविण्यास सुरुवात झाली आहे. कला परिवारातील पाच सदस्य यासाठी कष्ट घेत असून, शुक्रवारपासून सुरू झालेले हे चित्र किमान १० दिवस काम केल्यानंतर पूर्ण
होऊ शकणार आहे. संपूर्ण रामायणात असलेल्या प्रसंगांचे चित्र यात साकारण्यात येणार आहे.
त्यात रामजन्मापासून ते रावणदहन अशी सुमारे ३० प्रसंगे चित्रित करण्याचा कलावंतांचा प्रयत्न आहे. शासनाच्या जलसंपदा विभाग आणि प्रख्यात चहाविक्रेती कंपनी यांच्या सहकार्यातून महाकाव्याचे महाचित्र साकारले जात असून, त्यासाठी किमान ३०० लिटर रंग वापरले जाणार आहेत. हे सर्व रंग डोळ्यांना आल्हाददायक असे असतील आणि पावसाच्या तसेच पुराच्या पाण्याचा त्यावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने ते वापरण्याचा प्रयत्न असल्याचे कला परिवाराच्या सदस्यांनी सांगितले. आत्तापर्यंत १०० लिटर रंगांचा वापर झाला असून, सायंकाळपर्यंत हनुमानाची सूर्याकडे झेप, रामजन्म, सीतास्वयंवर यांसारखी काही प्रसंगांची चित्रे पूर्ण झाली होती. अजूनही रावणदहनापर्यंतची विविध चित्रे येत्या दहा दिवसांत पूर्ण करणार असल्याचे कलावंतांनी सांगितले.

Web Title: The Ramayana, pictured in Ramghat