जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात
By Admin | Updated: July 30, 2014 00:20 IST2014-07-29T23:28:28+5:302014-07-30T00:20:54+5:30
जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात
मालेगाव : शहर-तालुक्यात रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील जवळपास दहा प्रमुख इदगाह मैदानांवर विशेष नमाजपठण करण्यात आले.
सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली येथील कॅम्प रस्ता इदगाह मैदानावर प्रमुख नमाजपठण झाले. त्यात जवळपास एक लाख मुस्लीम धर्मीयांनी सहभागी होऊन दुवापठण केले. जवळपास पाऊण तास हे नमाजपठण सुरू होते. आपल्या भाषणात आमदार मौलाना यांनी शांतता व एकात्मतेचा संदेश दिला.
नमाजपठणानंतर महसूल व पोलीस प्रशासन तसेच शांतता समितीतर्फे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासह प्रमुख मौलवी व धर्मगुरूंचा फेटा बांधून, हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत संदीप पाटील, तहसीलदार दीपक पाटील, शांतता समितीचे दत्ता वडगे, केवळ हिरे, मा. कृ. जोशी आदि उपस्थित होते.
कॅम्प इदगाह मैदानासह शहरातील कालीकुट्टी, म्हाळदे मैदान, दरेगाव मैदान आदि प्रमुख दहा इदगाह मैदानावर सकाळी ईदचे नमाजपठण करण्यात आले. त्यात अबालवृद्धासह शहरातील लाखो मुस्लीम धर्मीयांनी सहभाग घेतला. महिलावर्गाने घरी नमाजपठण केले. नमाजनिमित्त इदगाह मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते संरक्षक जाळ्या लावून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नमाज काळात या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांनी नमाजपठणासाठी जाणाऱ्या मुस्लीम धर्मीयांसाठी पाण्याची व्यवस्था प्रमुख चौकात केली होती. नमाजपठणानंतर सर्व मुस्लीम धर्मीयांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. घरी परतल्यानंतर मित्रपरिवारासह शीरखुर्म्याचा आस्वाद घेण्यात मुस्लीम धर्मीय रममाण झाले होते.
रमजान ईदनिमित्त दोन-तीन दिवस शहरातील यंत्रमाग व्यवसायासह इतर छोटे-मोठे उद्योग बंद राहणार आहेत. अनेकजण ईद सणाचा आनंद लुटण्यासाठी सायंकाळनंतर सहकुटुंब सहलीस रवाना झाले. सदर सणानिमित्त शहरात दोन दिवसांपासून अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
आहे.