रमजान ईद : मुस्लीम बांधवांचे सामुहिकरित्या नमाजपठण
By Admin | Updated: June 26, 2017 13:21 IST2017-06-26T12:51:55+5:302017-06-26T13:21:40+5:30
भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला.

रमजान ईद : मुस्लीम बांधवांचे सामुहिकरित्या नमाजपठण
नाशिक : भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावरून देण्यात आला. हजारो समाजबांधव यावेळी रमजान ईदच्या नमाजपठणासाठी उपस्थित होते. पारंपरिक पध्दतीने उपस्थितांनी सामुहिकरित्या विशेष नमाज अदा केली.
रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील ईदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्त्वामध्ये शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी नमाजपठण केले. सकाळी ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये काही वेळ चिंतेचे वातावरण होते; मात्र क्षणार्धातच ढगाळ हवामान दूर होऊन सुर्यप्रकाश पडल्याने ईदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्याबाबत असलेली चिंता दूर झाली. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिक मैदानाच्या दिशेने येण्यास सुरूवात झाली होती. तासाभरात संपुर्ण मैदान तुडूंब भरले. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये अबालवृध्द यावेळी मैदानात जमले होते. नमाजपठणासाठी एकापाठोपाठ एक रांगा करण्यात आल्या होत्या.