आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

By Admin | Updated: November 27, 2014 23:53 IST2014-11-27T23:52:45+5:302014-11-27T23:53:01+5:30

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

Rajababu came? This house is yours! | आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

आलात राजबाबू? या, घर तुमचंच आहे!

प्रिय राजबाबू,
एकदा नाशिकला समाचारासाठी जाऊन यायला पाहिजे, असा विचार करता करता या विचार करण्यातच आपला बराच वेळ निघून गेलेला दिसतो. मागच्या वेळी म्हणे आपण येता येता राहूनच गेलात. हरकत नाही. पण समाचाराच्या बाबतीत सहसा हयगय करु नये, असे म्हणतात. पण आपण कोणाच्या म्हणण्या न म्हणण्याला आजवर कधीच धूप घातलेली नसल्याने, हे व्यावहारिक शहाणपणदेखील आपल्या बाबतीत कुचकामीच म्हणायचे!
समाचाराचे आपल्या भाषेत दोन अर्थ निघतात हे मात्र आपण नक्कीच जाणत असणार. पण तितकंच कशाला, या दोन्ही अर्थांनी एकदा जाऊनच येऊ नाशकात, असाच आपला विचार असणार. आता एकाचवेळी दोन समाचार म्हणजे अंमळ जास्तीचा वेळ लागणारच की. तो जमवता जमवताच उशीर झाला ना? असो.
पाच वर्षांपूर्वी ज्या गावानं आपले एकदम तीन शिलेदार विधानसभेत पाठवून दिले आणि अर्धशतकाहून अधिकचे मावळे पालिकेत निवडून दिले, त्या गावाविषयी आपल्या मनात ममत्वाची भावना राहणारच की! आणि ती आहे म्हणूनच मागच्या वेळच्या तीन शिलेदारांपैकी दोघानी सरळ आपटी खाल्ली तर तिसऱ्यानी रणांगणाला सामोरे जाण्याच्या आधीच चक्क पाठ दाखवली म्हटल्यावर भले कितीही वाघाचं असलं तरी काळीज फाटून जाणारच की नाही? या तिघातील, तिसऱ्याचं जरा बाजूला राहू द्या. तो कोणाचाच कधी झाला नाही, तर तुमचा काय होणार? तरीही त्यानी तुमच्या गळी उतरुन आपल्या उत्तराधिकाऱ्याची सोय करुन घेतली. यात त्याचं बेरकेपण सरस ठरलं की तुमचं ‘भोळेपण’ सरस, याचा शरद पवारीय भाषेत निकाल घेणं तसं कठीणच. पण उरलेल्या दोघांचं तसं नव्हतं. त्यांची सारी भिस्त तुमच्यावरच. त्यांनी आपला करिष्मा अगदी जवळून बघितलेला आणि अनुभवलेला असताना, त्यांचा तेजोभंग व्हावा व त्यांच्या अनामतेलाही कुर्बान व्हावं लागावं, यालाच आंग्ल भाषेत ‘इन्सल्ट टू इन्जुरी’ म्हणतात, ना राजबाबू? तेव्हां त्यांच्या सांत्वनासाठी येणं हा तुमच्या इटिनररीमधला पहिला समाचार!
आपण एकेक मावळा अगदी निवडून निवडून घेतला, त्याच्यावर विश्वास टाकला, प्रत्येकातच आपण स्वत: राज ठाकरे बघितला आणि असे असताना या दोघांसकट आणखीही अनेकाना नाशिक जिल्ह्याने नाकारावं, यात कुठेतरी दगाफटका झाला असणार, या भावनेनं ओथंबून आणि दगाफटका करणाऱ्यांचा आता खरपूस घ्यावाच लागणार या मिषानं आपण आला असल्याने आपल्या अजेंड्यावरील हा दुसरा समाचार! होय की नाही?
अर्थात, या दुसऱ्या समाचारप्रसंगी काय होणार वा काय होऊ शकतं याची चुणुक आपल्या परवाच्याच एका वक्तव्यावरुन दिसून आली होती. होर्डींग्ज लावले तर सरळ पक्षातून काढून टाकू, असा सज्जड दमच आपण देऊन टाकला. बहुधा या वक्तव्यामधूनच मुंबई उच्च न्यायालयाने प्रेरणा घेतली असावी? चांगलं आहे.
आपण नाशकात अवतीर्ण झाल्यानंतर अगदी थेट प्रभागा प्रभागामध्ये जाऊन मावळ्यांची झडती घेणार असल्याचं आणि जे शिलेदार पराभवले त्यांना एकांतात बोलवून त्यांचा समाचार (पहिलावाला) घेणार असल्याचं ऐकिवात आहे. काय आहे, राजबाबू, आपण अखेर ठाकरे आहात, गर्दीचे आणि केवळ गर्दीचेच दर्दी आहात, तेव्हां प्रभागा प्रभागाचं राहू द्या, आख्ख्या नाशकातल्या साऱ्या मावळ्यांना एकझुंडीनं बोलावलं तरच कदाचित गर्दीचं दर्शन होईल असं आता नाशिककरांना उगाचंच वाटतं. ते खोटं ठरो, हीच मायभवानी जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
आता थोडं विषयांतर. तुमच्या स्वत:च्या तुमच्याच मावळ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. त्या असायलाही काही हरकत नाही. पण मग नाशिककरांनी तुमच्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या, त्यांचं काय करायचं? अर्थात या अपेक्षा तशा आपोआपच नाही वाढल्या. तुम्हीच त्या वाढवून ठेवल्या. आणि तसं म्हटलेलं कदाचित आपल्याला आवडणार नाही, पण या अपेक्षांची पार माती झाली की हो? तेव्हां नाशिककरांनी कोणाचा समाचार (दुसरावाला) घ्यायचा? पण पूर्वानुभव लक्षात घेता, तो प्रश्न नाशिककरांनी अन्य कोणावरही न सोडता, स्वत:च स्वत: सोडवून घेतला. वाईट वाटून घेऊ नका, पण नाशिककरांनी तो असा काही सोडवला की, ज्याचं नाव ते आणि आपल्या सांप्रतच्या दौऱ्यांचं प्रयोजनदेखील तेच आहे ना?
आपले कल्याण असो!
- इति लेखनसीमा

Web Title: Rajababu came? This house is yours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.