‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

By Admin | Updated: March 2, 2015 00:08 IST2015-03-01T23:33:38+5:302015-03-02T00:08:24+5:30

‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

Raj Thackeray's 'homework' for 'Maratha' editor! | ‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

सुदीप गुजराथी ल्ल नाशिक
आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाचे हक्क विकत घेऊन मनसेचे मुखपत्र काढण्याच्या तयारीत असलेल्या राज ठाकरे यांनी आता ‘संपादक’पदाचा गृहपाठ सुरू केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज यांनी मनसेच्याच ग्रंथोत्सवातून आचार्य अत्रे यांची सर्वच्या सर्व वैचारिक पुस्तके विकत घेऊन याचाच प्रत्यय दिला. विशेष म्हणजे, या पुस्तकांचे साडेचार हजार रुपयांचे बिलही त्यांनी जागेवरच भरले.
आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’च्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ढवळून काढली होती. ‘मराठा’तील त्यांच्या घणाघाती अग्रलेखांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते; मात्र अत्रे यांच्या निधनानंतर ‘मराठा’ दैनिक बंद पडले होते. याच ‘मराठा’चे हक्क राज ठाकरे यांनी अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्याकडून विकत घेतले असून, ‘मराठा’याच नावाने ते पक्षाचे मुखपत्र सुरू करणार आहेत. त्याच्या संपादकपदी ते स्वत:च विराजमान होणार असून, राज यांच्या या नव्या इनिंगविषयी राज्यभर उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशकात मनसेच्या वतीने ग्रंथोत्सव सुरू आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज यांनी या ग्रंथोत्सवाला आवर्जून भेट दिली. मोठ्या उत्सुकतेने आणि बारकाईने ग्रंथप्रदर्शन पाहतानाच त्यांनी अनेक पुस्तकांची खरेदी केली. त्यांत आचार्य अत्रे यांच्या सर्व वैचारिक पुस्तकांचा समावेश होता. अन्य पुस्तकांचे लेखक, प्रस्तावना, अनुक्रमणिका असा तपशील पाहून घेणाऱ्या राज यांनी अत्रेंची पुस्तके मात्र फक्त मुखपृष्ठ पाहूनच खरेदी केली. त्यांत नवयुग वाचनमाला, अत्रेप्रहार, अत्रेवेद, अत्रे उवाच, हंशा आणि टाळ्या, झालाच पाहिजे!, सूर्यास्त, वस्रहरण, आत्रेय वाणी, अध्यापक अत्रे (डॉ. स. गं. मालशे) आदि पुस्तकांचा समावेश होता. अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनिकात, ‘नवयुग’ साप्ताहिकात व ‘अध्यापन’ मासिकात वेळोवेळी केलेल्या लेखांचा व भाषणांचा या पुस्तकांत समावेश आहे.
विशेष म्हणजे, आचार्य अत्रे यांचे अन्य कथासंग्रह, नाटकांच्या पुस्तकांना राज ठाकरे यांनी हातही लावला नाही. या ग्रंथोत्सवातून त्यांनी एकूण २७ पुस्तके विकत घेतली. त्यांचे ४ हजार ५२० रुपये एवढे बिल झाले. ते राज यांनी स्वीय सचिवामार्फत भरले आणि मगच मुंबईचा रस्ता धरला.

Web Title: Raj Thackeray's 'homework' for 'Maratha' editor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.