नाशिक : शहरात तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच दिवसाच्या दौऱ्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून चाचपणी करण्यासाठी ते नाशिक येथे गुरुवारी (दि. २३) नाशकात दुपारी १ वाजता दाखल झाले होते. आल्या आल्या त्यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून केवळ यादीतील नावांप्रमाणेच चार ते पाच जणांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सायंकाळपर्यंत विविध विभागप्रमुख, अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड गुप्तगू केले.लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात पाच उमेदवारांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा घेतल्या होत्या. परंतु, पाचही ठिकाणी मनसेचे पानिपत झाले. त्यात विधानसभा निवडणुका आधी मनसेला गळती लागली होती. त्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत पुन्हा गटबाजी उफाळून आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील बंडाळी अधिक उफाळून येऊ नये यासाठी ठाकरे यांनी नाशिकला धाव घेतली होती. दुसऱ्या दिवशीही म्हणजे शुक्रवारी (दि. २४) ते काही पदाधिकाऱ्यांना भेटणार होते. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते, पण सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास ते मुंबईकडे रवाना झाले. एका अर्जंट मीटिंगसाठी मुंबईकडे ते रवाना झाल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.