राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले
By Admin | Updated: April 4, 2015 01:47 IST2015-04-04T01:46:31+5:302015-04-04T01:47:10+5:30
राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले

राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ही काही महापालिकेची जबाबदारी नाही. केंद्र व राज्य सरकारने अद्याप निधीच वितरित केला नसल्याचे धक्कादायक विधान नाशिक दौऱ्यात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले असून, जबाबदारी झटकणाऱ्या ठाकरे यांनी केवळ हवापालटासाठी नाशकात येऊन गोदापार्कवर फेरफटका मारण्यापेक्षा सिंहस्थ कामांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला आहे. दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येऊन गेलेल्या राज ठाकरे यांनी सिंहस्थाची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असल्याचे सांगतानाच सरकारकडून अद्याप पैसेच आले नसल्याचे विधान पत्रकारांशी बोलताना केले होते. शहरातील तीनही भाजपाच्या आमदारांनी राज ठाकरे यांच्या या विधानाचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राज ठाकरे यांच्या विधानाबद्दल आश्चर्य व्यक्त करत सांगितले, मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थ निधीबाबत महापालिकेचा आर्थिक भार कमी करत ७५ टक्के हिश्शाची जबाबदारी कोणतेही आढेवेढे न घेता सरकारकडे घेतली. महापालिकेत सत्ता कोणाची आहे, याचा विचार केला नाही. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी वारंवार सिंहस्थाविषयी बैठका घेतल्या. राज ठाकरे यांनी सिंहस्थाबाबत विशेष बैठक घेतल्याचे स्मरत नाही.