नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या पंधरवाड्यात दोन दौरे रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तिसरा दौराही केवळ दोनच तासात आटोपल्याने दौऱ्याचे ‘राज’ नेमके काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज यांचे सकाळी ११ वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये आगमन झाले. तेथे मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेशाध्यक्ष सलिम शेख, डॉ. प्रदीप पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकूश पवार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर, झेंडे लावण्यात आले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्व'भूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात होता. त्यांनी या दोन तासात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे काही नेत्यांनी सांगितले. बरोबर सवा वाजता राज ठाकरे हे अतुल चांडक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी रवाना झाले अन दौरा आटोपला.
त्यामुळे अवघ्या दोन तासांच्या दौऱ्यात नेमके काय झाले याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. दरम्यान, मनसेच्या राजगड येथील कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी येत्या ५ जून रोजी राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यावेळीही राज ठाकरे बैठक घेणार असून त्यावेळी पक्ष संघटनेत बदलही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.