पावसाळी नाला पावसाच्या पाण्यानेच झाला साफ
By Admin | Updated: October 3, 2015 23:13 IST2015-10-03T23:12:48+5:302015-10-03T23:13:23+5:30
पावसाळी नाला पावसाच्या पाण्यानेच झाला साफ

पावसाळी नाला पावसाच्या पाण्यानेच झाला साफ
इंदिरानगर : पावसाळी नाला अखेर पावसाच्या पाण्याने झाला साफ, पण महापालिका प्रशासनास जाग आलीच नाही. पेठेनगर रस्त्यापासून ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत नैसर्गिक नाला आहे.
सदर नाला महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, आदर्श कॉलनीसह विविध कॉलनी आणि सोसायट्यांमधून गेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये शिरत असे. यामुळे महापालिकेने पाच वर्षांपूर्वी पेठेनगर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत सदरचा नाल्याचे सीमेंट कॉँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा त्रास कमी झाला. परंतु सदर नाला हा पावसाळ्यापुरताच राहिला असून, त्यामध्ये भूमिगत गटारींचे पाणी सोडण्यात आल्याने त्यास उघड्या गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाल्यातील घाण व दुर्गंधीमुळे नाल्यालगत राहणाऱ्यांना दारे, खिडक्या उघडता येत नाहीत. अनेक वेळा परिसरातील रहिवाशांनी या नाल्यातील भूमिगत गटारींचे पाणी बंद करण्याची मागणी संबंधित नगरसेवक व प्रशासनाकडे केली होती. याबाबत प्रभागाच्या नगरसेवकांनी प्रभागसभेत प्रशासनास धारेवर धरले होते. जुलै महिन्याच्या प्रभागसभेत नाले सफाईसाठी पाच लाखाच्या निधीस मंजुरी दिली होती. मात्र अद्यापही नाले स्वच्छ करण्यात आले नव्हते.