घरपट्टीवर हरकतींचा पाऊस; प्रत्यक्ष होणार पाहणी
By Admin | Updated: July 25, 2014 00:42 IST2014-07-25T00:09:30+5:302014-07-25T00:42:37+5:30
घरपट्टीवर हरकतींचा पाऊस; प्रत्यक्ष होणार पाहणी

घरपट्टीवर हरकतींचा पाऊस; प्रत्यक्ष होणार पाहणी
नाशिक : महापालिकेच्या वतीने आकारल्या जाणाऱ्या घरपट्टीत अवाजवी देयके दिली किंवा सुधारित पट्टीसाठी नोटिसा बजावल्यानंतर मिळकतधारकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. यासंदर्भात हरकतींची सुनावणी घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन मिळकती मोजल्या जाणार आहेत.
रहिवासी क्षेत्रासाठी ५ रुपये ५० पैसे, औद्योगिक क्षेत्रासाठी ४ रुपये ९५ पैसे आणि वाणिज्य वापरासाठी १९ रुपये ५० पैसे प्रति चौरस फूट याप्रमाणे घरपट्टीचे दर आकारले जातात. पालिकेने गेल्यावर्षी सुधारित घरपट्टी लागू केल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या कालावधीत सिडको विभागातून २५०, पूर्व विभागातून २२५, नाशिकरोड १८५, सातपूर ८५, पंचवटी १७५, पश्चिम विभागातून ५५ हरकती प्राप्त झाल्या. त्यावर विविध कर वसुली विभागाने सुनावणी दिली आणि हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले. काही ठिकाणी पालिका, तर काही ठिकाणी नागरिकांनी चुकांची दुरुस्ती मान्य केली. तथापि, ज्या मिळकतींबाबत निराकरण झाले नाही, त्याबाबत आता प्रत्यक्ष मिळकतींची मोजणी केली जाणार आहे. बांधीव मिळकतींबरोबरच खुल्या जागांवरही कर आकारणी केली जाते. (प्रतिनिधी)