रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या पाइपांची चोरी
By Admin | Updated: July 19, 2014 00:56 IST2014-07-19T00:39:33+5:302014-07-19T00:56:00+5:30
उड्डाणपूल : द्वारका ते आडगाव नाका मार्गावरील प्रकार; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या पाइपांची चोरी
कोणार्कनगर : उड्डाणपुलावर रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी टाकण्यात आलेल्या पीव्हीसी पाइपांची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आडगाव नाका ते द्वारका यादरम्यान ठिकठिकाणी पाइप कापून नेण्यात आले आहेत.
उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून पुलासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पाइप जमिनीत सोडण्यात आले आहेत. पुलाचे काम सुरू असतानाच उड्डाणपुलावर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते ते पाणी घालविण्यासाठीदेखील आउटलेट काढण्यात आले आहेत. त्यासाठी काही ठिकाणचे पीव्हीसी पाइप टाकून ते पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पाइपला जोडण्यात आलेले आहेत. आडगाव नाका ते द्वारकापर्यंत असे अनेक ठिकाणी पाइप टाकण्यात आले आहेत. अशा प्रकारची उपाययोजना करण्यात आली असली तरी आडगाव नाका ते द्वारकादरम्यान अनेक ठिकाणी या पीव्हीसी पाइपांची चोरी झाली आहे. रात्री उशिरा तसेच पहाटेच्या सुमारास पुलाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांकडून पाइपांची चोरी करण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाइपची चोरी होत असताना त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने चोरट्यांना रान मोकळे आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना उड्डाणपुलाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर चोरीच्या प्रकाराला आळा घालून पावसाचे पाणी वाचविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला वाचविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)