नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाची कृपादृष्टी बरसू लागल्याने जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टँकर्सच्या फेऱ्या बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीतही वाढ होऊ लागली असून विहिरींनाही पाणी वाढले आहे. त्यामुळे या आठवड्यात टँकर्स बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १४ गावांमध्ये ९ टँकर्स सुरू आहेत.
जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने चिंता वाढली होती. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने पावसाचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ९ गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. अजूनही १४ गावे, ६ वाडे अशा एकूण २० ठिकाणी ९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक ६ टँकर्स सुरू आहेत. आता येवल्यातही चांगला पाऊस पडल्याने टँकर्सची मागणी कमी होणार आहे. बागलाणमध्ये ४, देवळा येथे २, मालेगावमध्ये २, तर येवला येथे ६ गावांमध्ये टँकर्स सुरू आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संततधार धरल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या वाड्या-पाड्यावरही पाऊस सुरू असल्यामुळे वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेले टँकर्स देखील बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे गणितही बिघडले आहे. जून-जुलै कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. जुलैच्या मध्यानंतर पडलेल्या पावसामुळे दुबारचे संकट काही प्रमाणात टळले. त्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी आता सुखावला असून त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आनंदाची बरसात घेऊन आलेल्या या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना देखील जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
--इन्फो--
सोयाबीन, भुईमूग पिकांना दिलास
या पावसामुळे शेतकरी सुखावले असून पिकांना जीवदानही मिळाले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पाऊसच नसल्याने संततधारेमुळे विहिरींमध्ये पाणी उतरण्यास या पावसाची मदत होणार आहे. पाण्याची गरज असलेल्या सोयाबीन, भुईमूग, मका, या पिकांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी पिकेही वाचली आहेत.
दरम्यान, गंगापूर धरण ८२ टक्के भरल्याने नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.