परतीचा पाऊस राहणार दमदार
By Admin | Updated: September 7, 2016 00:53 IST2016-09-07T00:53:34+5:302016-09-07T00:53:42+5:30
परतीचा पाऊस राहणार दमदार

परतीचा पाऊस राहणार दमदार
नाशिक : पुनर्वसू आणि आश्लेषा नक्षत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर आणि दारणा धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. सध्या पावसाने ओढ दिली असली तरी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये परतीचा पाऊस दमदार राहणार असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविलेले आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शहरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्वसू नक्षत्रात तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात आश्लेषा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. १० जुलै रोजी झालेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. त्यानंतर दि. २ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने गोदावरीसह सर्व नद्या दुथडी भरून वाहिल्या होत्या. महापुरामुळे आणि गंगापूर धरणातील पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली होती. आता गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली असून, अधूनमधून तुरळक सरी कोसळत असतात. मघा आणि पूर्वा नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या पूर्वा नक्षत्र सुरू असून, गाढव या वाहनावर स्वार होऊन आलेल्या या नक्षत्रातील उत्तरार्धात म्हणजे ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत बऱ्यापैकी पावसाचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तविले आहे. दि. १३ सप्टेंबरला सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करणार असून, त्यावेळी १३ आणि १४ सप्टेंबरला तसेच १८ ते २२ सप्टेंबरला चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या गणरायाचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने गणेशभक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. दि. २६ सप्टेंबरला हस्त नक्षत्र लागणार असून, या नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे परतीचे पाऊसमान चांगले राहणार आहे. अखेरच्या चित्रा आणि स्वाती नक्षत्रात मात्र मध्यम पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.