लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?
By Admin | Updated: October 16, 2015 22:11 IST2015-10-16T22:10:30+5:302015-10-16T22:11:25+5:30
लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?

लहरी पर्जन्यामुळे रब्बीचेही क्षेत्र घटणार?
नाशिक : खरीप हंगामात अपेक्षित हजेरी न लावलेल्या पावसामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, तर काही ठिकाणी खरिपाच्या पेरण्या जळून गेल्या होत्या. या लहरी पर्जन्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता असून, मागील वर्षाच्या तुलनेत रब्बीचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १० ते १५ हजार हेक्टरने घटण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र कमी कमी होत चालल्याचे सरासरी लागवडीच्या आकडेवारीवरून दिसते. सन २०१३-१४ या वर्षात रब्बी हंगामासाठी एकूण सरासरी लागवडीचे क्षेत्र १ लाख ३२ हजार ७०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. तीच बाब सन २०१४-१५ वर्षात रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र १ लाख ६५ हजार ९०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. आताही या वर्षात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामाचे सरासरी लागवडीचे १ लाख ४५ हजार ६०० हेक्टर असताना प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर लागवड होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तर पावसानेही दडी मारल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर व पिकांच्या क्षेत्रावर होणार आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू व हरभरा हीच प्रमुख पिके आहेत. कमी पावसाने दोन्ही पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)