पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी
By Admin | Updated: June 24, 2015 02:06 IST2015-06-24T02:06:12+5:302015-06-24T02:06:54+5:30
पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी

पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी
नाशिक : उशिराने का होईना आगमन झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या सुमारे ९६ टक्के पाऊस गेल्या दोन दिवसांत नोंदविला गेला असून, नाशिक व मालेगाव या दोन तालुक्यांनी जून महिन्याची सरासरी ओलांडल्याने शेतकऱ्यांच्या शेती कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्ह्यात फक्त २८ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली होती. जून महिन्याची जिल्ह्याची सरासरी १५४.९७ मिलिमीटर इतकी आहे. गेल्या दोन दिवसांत ९६.५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २४२.५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. त्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी (६२) इतका असून, त्या खालोखाल नाशिक (२३) मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबक तालुक्याकडे अजूनही पावसाची वक्रदृष्टी आहे. त्र्यंबक तालुक्याची जून महिन्याची सरासरी २६०.५० मिलिमीटर असून, आजपावेतो १४५ मिलिमीटर म्हणजेच निम्माच पाऊस झाला आहे. त्यामानाने नाशिकच्या ९३.५० मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत ९२.२ मिलिमीटर पाऊस झाला, तर मालेगाव तालुक्याची १०२ मिलिमीटरची सरासरी ओलांडून तेथे १४३ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण पावसाळ्याच्या एकूण टक्केवारीच्या प्रमाणात जिल्ह्यात ९ टक्के पाऊस गेल्या तीन दिवसांत नोंदविण्यात आला. गेल्या वर्षी यावेळी जेमतेम तीन टक्के पाऊस होता. (प्रतिनिधी)