सुरगाण्यात पावसाचे आगमन
By Admin | Updated: July 19, 2014 01:09 IST2014-07-18T23:10:12+5:302014-07-19T01:09:32+5:30
सुरगाण्यात पावसाचे आगमन

सुरगाण्यात पावसाचे आगमन
सुरगाणा : संपूर्ण जून महिना ज्याची सर्वच जण वाट पाहत होते त्या पावसाने आज संपूर्ण दिवसभर रिपरिप सुरू ठेवल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही अंशी सुटला असला तरी जून महिना व जुलैचा पहिला हप्ता हातचा निघून गेल्याने पीक उत्पादनासाठी उशिरा सुरू झालेला हा पाऊस फारसा उपयोगी नसल्याचे शेतकरीवर्गातून बोलले जात असून, चिंता व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी संध्याकाळी तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी संपूर्ण दिवस पाऊस रिपरिप सुरू होती. पाऊस जोरदार नसल्याने अद्यापही तालुक्यात कोरडे ठाक असलेले पाझरतलाव, वनतळे, गावतळे भरू शकले नाही. आता जोरदार पावसाची अपेक्षा असून, गावतळे भरू शकले नाही. आता जोरदार पावसाची अपेक्षा असून, पाण्याचा साठा होणे आवश्यक आहे. लहान-मोठे ओहळ व नाले अजूनही खळखळून वाहत नसले तरीही घाटमाथा परिसरात काही ठिकाणी नागलीची लावणी सुरू झाल्याचे दिसून आले. दरम्यान, तालुक्यातील बहुतांश भागात पेरण्या वाया गेल्याने दुबार पेरणी करावी लागली आहे, तर काहींना अजूनही करावी लागणार आहे.
पावसाने गुरुवारपासून रिपरिप सुरू ठेवल्याने शेतीकामांना वेग आला आहे. मात्र काही शेतकऱ्यांना दुबारपेरणीसाठी आर्थिक फटका बसला आहे. (वार्ताहर)