साकोरा परिसरात पावसाचे आगमन
By Admin | Updated: July 15, 2014 00:51 IST2014-07-14T22:05:18+5:302014-07-15T00:51:58+5:30
साकोरा परिसरात पावसाचे आगमन

साकोरा परिसरात पावसाचे आगमन
साकोरा : पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते. काल सायंकाळी पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजा तूर्त शेतीकामात व्यस्त झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रात्रभर अंधारात बसावे लागल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गतवर्षी या महिन्यात परिसरात कोळपणी व निंदणीची कामे जोरात सुरू होती. मात्र यावर्षी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील ईशान्येकडील साकोरासह, वेहळगाव, कळमदरी, जामदरी, सावरगाव, पळाशी, मंगळाणे, नवेपांझण, मुलडोंगरी, मंगळणे, गिरणाडॅम गावांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. काल सायंकाळी पावसाने नांदगावसह साकोरा परिसरात जोरदार सलामी दिल्याने नांदगाव-साकोरा रस्त्यावरील मोरखडी धरण पाण्याने अर्धे भरले. या पावसामुळे परिसरातील काही भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज दिवसभर नांदगावच्या बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून या परिसरात होणाऱ्या पहिल्याच पावसात जतपुरा शिवारात वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये दरवर्षीप्रमाणे बिघाड झाल्याने साकोरेकरांना रात्र-रात्र अंधारात बसावे लागत आहे. यावर्षीदेखील याचठिकाणी काल झालेल्या पावसामुळे किरकोळ बिघाडामुळे नागरिकांना तब्बल वीस तास अंधारात बसून डासांचा व प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. काल सायंकाळी हा बिघाड झाला. गावात एकच स्थायिक वीज कर्मचारी असून, बाकी सर्व बाहेरगावी राहतात. नांदगाव शहरात दहा हजार लोकसंख्या असताना २० ते २५ कर्मचारी राहतात. मात्र साकोऱ्यात ७५ रोहित्र व चार हजार वीजग्राहकांसाठी केवळ एकमेव कर्मचारी असल्याने गावावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. या कर्मचाऱ्याने सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला. गावात पुरेसे वीज कर्मचारी नेमावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)