Rain water here! | येथे साचते पावसाचे पाणी !
येथे साचते पावसाचे पाणी !

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे शहर व परिसरात जोरदार आगमन झाल्याचे सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असले तरी, या पावसामुळे दरवर्षाप्रमाणे यंदाही शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
थोडा पाऊस झाला तरी, रस्त्यांवर तळे साचू लागले असून, शहरातील बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहीपूल, सराफबाजार, मेनरोड, तांबटलेन, हुंडीवाला लेन या भागात तर चक्क गुढग्याएवढे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व गटारी, नाल्यांची साफसफाई करण्यात आली असली तरी, पहिल्याच पावसात त्याचे पितळ उघडले पडले आहे. उंच, सखल भाग, पाण्याचा निचरा होण्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे जागोजागी पाणी साचत असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा जालीम उपाय अद्याप मनपाला सापडलेला नाही.
इंदिरानगरला रस्ते झाले दिसेनासे; वाहनधारकांची नेहमीच तारेवरची कसरत
इंदिरानगर येथील मोदकेश्वर मंदिरालगत असलेला रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या पाण्याने दिसेनासा झाला असून, त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते.
मोदकेश्वर चौक ते बापू बंगला या रस्त्या दरम्यान असलेल्या मोदकेश्वर मंदिरालगत पावसाळ्यात पावसाचे पाणी नेहमीच साचून परिसरातील बंगल्यांमध्ये शिरत असल्याने तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने जिल्हा परिषद कॉलनी ते मोदकेश्वर मंदिर दरम्यान पावसाळी नाल्यांची काम करण्यात आले, परंतु तरीही पाऊस पडल्यावर मोदकेश्वर मंदिरालगत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद होतो. लाखो रुपये खर्च करून पावसाळी नाला तयार करण्यात आला तरी परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अंतर्गत रस्ते, गटारींनी साचते पाणी
४एकलहरे परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, पहाडीबाबा झोपडपट्टी, देशमुखवाडी, कन्नडवाडी, सामनगाव झोपडपट्टी, पेट्रोलपंप परिसर या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. पावसाळा सुरू झाला की या परिसरात हमखास पाणी साचते. पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकदा हेच पाणी घरांमध्ये शिरते.
४एकलहरे झोपडपट्टी परिसरात सिद्धार्थनगरपासून देशमुखवाडीपर्यंत असलेल्या रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात शिरते. येथील झोपडपट्टीत गटारींची व्यवस्था नसल्याने व रहिवाशांनी आपापल्या सोईने बेशिस्तपणे घरे उभारली असल्याने अंतर्गत रस्ते व गटारी अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. सिद्धार्थनगर चौकापासून सामनगाव कमानीकडे जाताना शिंदे हॉटेलजवळ मोठा खड्डा आहे. यामध्ये हमखास पाणी साचलेले असते. त्यामुळे सामनगावकडे जाणाºया वाहनांना अडथळा निर्माण होतो. कन्नडवाडी ते चेमरी दोन दरम्यान असलेल्या पेट्रोलपंपाच्या परिसरात पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधलेले असले तरी त्यातून पाण्याचा निचरा होण्याऐवजी तेच पाणी रस्त्यावर येऊन चिखल साचतो त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. दंडे वसाहतीमध्येही पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसी सोय नाही़
कायमस्वरूपी उपाययोजना करावी
गावठाण व झोपडपट्टी भागातील जुन्या उघड्या गटारी यांची तुटफूट झाली असून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने गटारी छोट्या पडत आहेत. तसेच उघड्या गटारीमुळे त्यात घाण, केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या, दगड-गोटे पडत असल्याने त्या तुंबत आहेत. यामुळे गावठाण व झोपडपट्टी भागात नव्याने ढापे टाकलेल्या मोठ्या गटारी करणे गरजेचे आहे. तसेच चढ-उतार भागामुळे गटारीचे काम करताना त्यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच चंदनवाडी, पवारवाडीसारखे परिसर खोलगट भागात असून, त्यांच्या आजूबाजूचे रस्ते त्यापेक्षा उंचावर आहे. त्यामुळे रस्त्याने पावसाचे पाणी वाहून खोलगट भागात साचते. यामुळे या भागात मनपाने भराव टाकून समांतर हा भाग करणे गरजेचे आहे.


Web Title:  Rain water here!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.