सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

By Admin | Updated: September 2, 2014 01:12 IST2014-09-01T22:23:01+5:302014-09-02T01:12:30+5:30

सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

Rain with thundershowers in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस



सिन्नर : गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस दररोज हजेरी लावत आहे. रविवारी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून आठ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसामुळे भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यापूर्वी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर मध्यंतरी उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर पूर्वभागात हलका पाऊस झाला आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणे, पाझरतलाव भरले आहेत, तर पूर्वभागात अद्यापही ठणठणाट आहे. मुसळगावपासून पूर्वेकडील गावांमध्ये केवळ तणपोशा पाऊस झाला आहे. सोमवारी उत्तर रात्रीपासून सिन्नर शहरात रिमझिम पाऊस सुरू झाला. सकाळी सातच्या सुमारास उघडीप दिली. रविवारी वडगावपिंगळा, चिंचोली, देशवंडी, नायगाव, बारागावपिंप्री, मोहदरी आदि भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे तर पूर्वभागात हलक्या सरी कोसळल्या आहेत. वडगाव पिंगळा येथील सुकदेव काशीनाथ सानप आपले चार जनावरे माळरानात चरायला सोडले होते. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळल्याने त्यांचा एक बैल जागीच गतप्राण झाला.
याप्रकरणी चिंचोलीचे पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. दुसऱ्या घटनेत पाटपिंप्री येथील गायरानात सायंकाळी गंगाधर शिवराम सैंद्रे हे शेळ्या व मेंढ्या चारत होते. यावेळी आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून सहा मेंढ्यांसह एक शेळी ठार झाल्याची घटना घडली. (वार्ताहर)

Web Title: Rain with thundershowers in Sinnar taluka