पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष
By Admin | Updated: March 26, 2015 00:51 IST2015-03-26T00:51:23+5:302015-03-26T00:51:33+5:30
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष
चांदवड : तीस लाख रुपये दिल्यास त्या बदल्यात पैशांचा पाऊस पाडून दोन कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार चांदवड येथे उघडकीस आला; मात्र या प्रकरणी भोंदूबाबाच्या अपहरणाचा गुन्हा वडनेरभैरव पोलिसांत दाखल झाला
आहे.
अटकेतील महिलेची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून, आता चांदवड पोलीस या प्रकरणी महिलेची चौकशी करत आहेत. दरम्यान, सदर भोंदूबाबा फरार असून, या प्रकरणी अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चांदवड तहसीलदार कार्यालयासमोरच असलेल्या एका घरात तीन महिन्यांपासून सदर प्रकार सुरू असूनही कुणाच्या लक्षात कसे आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चांदवड येथे एका घरात पैशांचा पाऊस पाडतो, अशा प्रकारचे आमिष दाखवण्यात येत होते. संतोष सौदे याच्या घरात गेल्या तीन महिन्यांपासून आंनदगिरी ऊर्फ राजेंद्र पगारे रा. वडाळीभोई व त्यांचे साथीदार एका महिलेसह जादूटोणाच्या सहाय्याने हा ‘उद्योग’ करीत असत.
प्रकरणाला वाचा फुटली !
नंदुरबार येथील एका महिलेशी काहींनी संपर्क साधून ३० लाख रुपये द्या, तुम्हाला दोन कोटी रुपये करून देतो, असे आमिष दाखविले. बाबाकडून पैसे न मिळाल्याने या महिलेने पैशांची मागणी केली; मात्र नकार मिळाल्यानंतर तथाकथित बाबाला घेऊन सदर महिला व तिचे साथीदार तवेरा गाडीने धुळ्याकडे जात असताना पगारे याने त्यांची पत्नी विद्या यांना फोन करून पोलिसांत अपहरणाची फिर्याद देण्यास सांगितले. त्याप्रमाणे विद्या पगारे हिने मुन्ना ऊर्फ समीर पानसरे व त्यांच्या साथीदारांविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. इमले यांनी पाठलाग करून त्यांना धुळे येथील टोलनाक्यावर महिलेसह राजेंद्र पगारे यांना पकडले.
सदर महिलेने पोलिसांना या बाबाने पैसे घेतल्याचे सांगीतले; मात्र त्याचवेळी रकमेबाबत निश्चित माहिती दिली नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला. पैशावरून पगारे व आमच्यात वाद झाल्याने आम्ही त्यास पळवून नेत असल्याचे सांगितल्यानंतर वडनेरभैरव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून महिलेस अटक केली. (वार्ताहर)