पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले.
By Admin | Updated: November 17, 2014 00:34 IST2014-11-17T00:33:33+5:302014-11-17T00:34:34+5:30
पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले.

पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले.
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने आज रविवारी रौद्रावतार धारण करीत शहराला तडाखा दिला. सायंकाळी मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. दीड तासात तब्बल ३९.२ मि.मी. पाऊस झाला. या पावसाने ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते. त्यामुळे रविवारच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले. बाजारपेठेत नागरिक तसेच वाहने अडकून पडल्याने जणू शहर ठप्प झाल्याचे चित्र होते.
वातावरणात बदल झाल्याने दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, पाऊसही हजेरी लावत आहे; मात्र आज सायंकाळी साडेपाचला शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा होता की, समोरचे दृश्यही दिसत नव्हते. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. त्यातच जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. रविवार असल्याने शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मेनरोड, दहीपूल परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र सखल भाग असल्याने तेथे थोड्याच वेळात गुडघ्याएवढे पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना आहे त्या दुकानातच थांबून राहावे लागले. काही ठिकाणी रस्त्यावरील ढापे उघडून दिल्याने त्यात पाय अडकण्याच्या भीतीने नागरिक रस्त्यावरून चालणेही टाळत होते. पाण्याच्या लोंढ्यामुळे नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहनेही अडकून पडली. सुमारे दीड तास धुवाधार पाऊस कोसळत होता; अनेक अडकलेल्या महिलांनी अखेर एकमेकींच्या आधाराने पाण्यातून वाट काढली.
दरम्यान, पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. साधारणत: २४ तासांत ६५ मि.मी. पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. शहरात अवघ्या दीडच तासात ३९.२ मि.मी. पाऊस झाल्याने ही एकप्रकारे अतिवृष्टीच होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)