नाशकात पावसाची धुवाधार बॅटिंग
By Admin | Updated: September 12, 2015 23:11 IST2015-09-12T23:11:18+5:302015-09-12T23:11:48+5:30
महापर्वणीवर सावट : पाण्याची पातळी वाढली

नाशकात पावसाची धुवाधार बॅटिंग
नाशिक : पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाने दीड तास ठाण मांडत विजेच्या कडकडाटात धुवाधार बॅटिंग केल्याने नाशिक शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहतानाच सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पिठोरी अमावास्येच्या मुहूर्तावर स्नानासाठी भाविकांना रामघाटावर जाण्यास मनाई करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट असून, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढल्या आहेत.
नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी रविवारी (दि. १३)श्रावणी अमावास्येला महापर्वणीनिमित्त प्रमुख आखाडे व खालशांमधील साधू-महंतांचे शाहीस्नान होणार आहे. त्यापूर्वीच पिठोरी अमावास्येचा मुहूर्त साधत भाविकांची सकाळपासूनच गोदाघाटावरील रामकुंडावर स्नानासाठी गर्दी उसळलेली असताना दुपारच्या सुमारास आकाशात कृष्णमेघांच्या गर्दीने अंधारून आले. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सुमारे दीड तास पावसाने धुवाधार बॅटिंग करत नाशिकला अक्षरश: झोडपून काढले. पावसाचा जोर वाढत गेला तसे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शहरातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये तसेच, झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सागरमल मोदी हायस्कूल जवळ, जिल्हा परिषद कॉलनी तसेच, द्वारका परिसरात वृक्ष उन्मळून पडले. तिगरानिया कंपनीजवळ तसेच, सोमवारपेठेत खांदवे गणपतीजवळ घराची भिंत पडण्याची घटनाही घडली. तपोवनातील साधुग्राममध्येही अनेक खालशांच्या तंबूंमध्ये पाणी घुसले. भाविकांचेही त्यामुळे हाल झाले. प्रामुख्याने पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पोलिसांनी गोदास्नानासाठी गर्दी केलेल्या भाविकांना रामकुंड व रामघाट परिसर सोडण्याचे आवाहन करत परिसर रिकामा केला. गांधीतलावालगतच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनुचित घटना घडू नये म्हणून जीवरक्षकांनी परिसराचा ताबा घेतला. जिल्हा प्रशासन व महापालिकेची आपत्कालीन व्यवस्था लगेचच कार्यरत झाली. भाविकांना सुरक्षिततेचे आवाहन करण्यात येऊ लागले. कपालेश्वर परिसरातही गुडघाभर पाणी साचल्याने भाविकांची तारांबळ उडाली. पाऊस सुरू असतानाही भाविकांनी रामसेतू ते टाळकुटेश्वर परिसरात स्नानासाठी गर्दी केली होती. रविवारी महापर्वणीकाळ असल्याने पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीला अगोदरच १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सुरू केल्याने गोदापात्रात वाहते पाणी असतानाच पावसानेही हजेरी लावल्याने आजूबाजूच्या नाले, ओहोळांचे पाणी गोदापात्रात येऊन मिळाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. कपालेश्वर परिसरात तर इंद्रकुंड परिसरातून येणाऱ्या नाल्याचे पाणी येऊन मिसळले. साधारणपणे सव्वा पाच वाजेच्या सुमारास पावसाचा जोर थंडावल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. शहर व परिसरात ढगाळ वातावरण कायम असून, रविवारी होणाऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.