जिल्ह्यात पावसाची हुलकावणीच
By Admin | Updated: June 28, 2016 00:32 IST2016-06-28T00:32:05+5:302016-06-28T00:32:27+5:30
प्रतीक्षा कायम : ढगाळ वातावरण

जिल्ह्यात पावसाची हुलकावणीच
नाशिक : मागील आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि. २७) दिवसभर कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान असूनही पावसाने शहरासह जिल्ह्याला हुलकावणीच दिली. दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील काही भागांत अत्यल्प अगदी तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली.
शनिवारी (दि. २७) दुपारी अगदी तुषार फवारावे तसे काही प्रमाणात शहरातील मोजक्या भागात पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस इतका अत्यल्प होता की रस्तेही ओले झाले नाही. दिवसभर आकाशात बहुतांश वेळा काळे कुट्ट ढग जमा होऊनही पावसाने नाशिककरांना हुलकावणीच दिल्याचे चित्र होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र पावसाची अगदी तुरळक स्वरूपात हजेरी असल्याने अजूनही खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. पाऊस समुद्राच्या किनारपट्टीतच थांबल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईला पाऊस झाला की तो नाशिकलाही सुरू होण्याचे चित्र होते. मात्र यावर्षी मुंबईला सलग तीन दिवस पाऊस होऊनही पावसाने नाशिककडे पाठ फिरविली. पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)
त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय खरिपाच्या पेरण्यांना गती येणे शक्य नसल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.