जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By Admin | Updated: July 3, 2016 22:23 IST2016-07-03T22:19:51+5:302016-07-03T22:23:54+5:30

दिवसभर रिपरिप : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार

Rain all over the district | जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

 सिन्नर : शहर व तालुक्यात रविवारी पहाटेपासून पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मध्यम, तर पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून सिन्नर तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने व यावर्षी पाऊस लांबल्याने सर्वसामान्य जनतेसह प्रशासन हतबल झाले होते. गेल्या आठवड्यात तालुक्यातील कुंदेवाडी, खंबाळे,
दोडी भागात मुसळधार पाऊस झाला होता. मात्र उर्वरित तालुका कोरडाच होता.
रविवारी पहाटेपासून शहर व तालुक्यात पावसाचे सुखद आगमन झाले. ठाणगाव परिसरात पावसाचा जोर चांगला होता. सिन्नर शहरात अधून-मधून सरी कोसळत होत्या. पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात पावसाचा जोर लागला होता, तर पूर्व भागात रिमझिम तर कधी मध्यम सरी कोसळत होत्या. या पावसाने खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश भागात अद्याप खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र रविवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या
मध्यम पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने व सुमारे महिनाभर पाऊस लांबल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वांना धीर मिळाला आहे. या पावसात जोर नसला व विहिरींना पाणी उतरण्याची शक्यता नसली तरी खरिपाच्या पेरण्या होऊ शकतील अशी आशा आहे. भविष्यात पाऊस पडेल या अपेक्षेवर शेतकरी पेरणीच्या कामाला वेग देतील.
या मध्यम पावसामुळे मात्र
टॅँकरचे प्रमाण घटण्याची
शक्यता नाही. सलग तीन-चार दिवस पाऊस चालल्यास टंचाईची
तीव्रता कमी होऊ शकते. मात्र
रविवारी सकाळपासून पाऊस पडता झाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.
ओझरला पाऊस
ओझर टाऊनशिप : परिसरात आज सकाळी सात वाजेपासून दमदार पाऊस सुरू झाला. दुपारपर्यंत पाऊस झाला. काही दिवसांपासून वातावरण तयार होऊनही हुलकावणी देणाऱ्या पावसाने कालही दिवसभरात कमीजास्त प्रमाणात हजेरी लावली. आज झालेल्या दमदार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. दुपारनंतर काही वेळ रिमझिम, तर काही वेळ दमदार असा पाऊस सुरू होता. (वार्ताहर)

Web Title: Rain all over the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.