नियोजनात रेल्वे धावली सुपरफास्ट
By Admin | Updated: October 4, 2015 23:01 IST2015-10-04T22:59:21+5:302015-10-04T23:01:27+5:30
दूरदृष्टी : उत्पन्नापेक्षा साधनसामग्रीवर लक्ष केंद्रित; परतीच्या भाविकांमुळे मिळाले उत्पन्न

नियोजनात रेल्वे धावली सुपरफास्ट
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात उत्पन्नाची आर्थिक गणिते मांडण्यापेक्षा कायमस्वरूपी साधनसामग्री कशी निर्माण होईल, असेच नियोजन करणाऱ्या रेल्वेला नाशिकचा कुंभमेळा चांगलाच पावला. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर चौथा प्लॅटफॉर्म, ओव्हरब्रीज, नवीन तिकीट केंद्र, रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी आदि महत्त्वाची कामे झाल्याने मोठे इन्फ्रास्टक्चर उभे राहिले. रेल्वेला सिंहस्थाच्या माध्यमातून फारसे उत्पन्न अपेक्षित नसले तरी, रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कुंभ भरला गेला, असेच म्हणावे लागेल.
सिंहस्थ कुंभमेळ्यातून किती उत्पन्न मिळेल आणि किती भाविक प्रवास करतील याचे गणित मांडण्यापेक्षा रेल्वेने इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवरच अधिक भर दिला. त्याचा फायदा नाशिकरोड रेल्वेस्थानकाला झाला असून, रेल्वेस्थानकाचे संपूर्ण स्वरूपच बदलून गेले आहे. सिंहस्थाच्या काळात देशभरातून रेल्वेने सुमारे ७० ते ८० लाख भाविक प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तिकीट काढून किती भाविक प्रवास करतील याविषयी रेल्वे प्रशासन साशंक असल्याने आर्थिक गणित मांडले गेले नाही, असे रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही तीन महिन्यांच्या काळात सुमारे ४५० विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून अंदाजे २१ करोड इतके उत्पन्नही मिळाले. रेल्व खात्याने उत्पन्नाचे गणित आखण्यापेक्षा कायमस्वरूपी इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे राहील यावर लक्ष केंद्रित केल्याने रेल्वेचा खजिना भरला नसला तरी, इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिल्याने रेल्वे विभागाने त्यातच समाधान मानले आहे.
कोणत्याही यात्रा विशेष गाड्यांचे नियोजन करताना रेल्वे मंत्रालयाकडून केवळ गाड्या पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. तेथे उत्पन्नाचा विषय नसतो. हाच विचार सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात आला. त्यामुळे उत्पन्नापेक्षा भाविकांची सोय आणि साधनसामग्री यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले होते. याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. देशभरातून भाविकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनासासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामगिरीवर होते.
रेल्वेने वेळोवेळी ४५० गाड्या सोडल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या गाड्यांमधून रेल्वेला फारसे उत्पन्न मिळालेच नाही. या गाड्या कधी आल्या आणि कधी गेल्या याचा पत्ताच नाही. मात्र परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांचा उपयोग झाला. सुमारे ४० ते ५० लाख भाविक रेल्वेने रवाना झाले.