नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्याप्रकरणी नाशिकच्यान्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढल्यानंतर हिंगोली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सरकारची माफी मागितली आणि ते सरकारकडून आर्थिक मदत घेत होते, अशी टीका त्यांनी केली होती. यासंदर्भात नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी देवेंद्र भुतडा यांनी २०२० मध्ये ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या न्यायालयात फौजदारी कलम ५०० आणि ५०४ अन्वये दावा दाखल केला होता. अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय बंदींना तत्कालीन ब्रिटिश सरकारने आर्थिक मदत कुटुंब चालवण्यासाठी दिली होती, मात्र, सावरकरांनी अर्ज करूनही ती ब्रिटिशांनी दिली नव्हती, गांधी यांचा आरोप चुकीच्या माहितीच्या आधारावर आहे, असा दावा ॲड. पिंगळे यांनी केला होता. सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती नरवाडीया यांच्यासमोर त्यांची गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे राहुल गांधी हजर राहिले. त्यांनी आपल्याला आरोप कबूल नसल्याचे सांगितले. परंतु, त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.