मांडवडच्या रणरागिणींचा रुद्रावतार
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-11T23:49:29+5:302014-07-12T00:24:41+5:30
मांडवडच्या रणरागिणींचा रुद्रावतार

मांडवडच्या रणरागिणींचा रुद्रावतार
नांदगाव : स्वस्त धान्य दुकानांमधले धान्य काळ्याबाजारात विकले जाते, तसेच बनावट रेशनकार्डांचाही सुळसुळाट झाला असल्याच्या तक्रारीला पुरेपूर बळ देणारी घटना आज मांडवडच्या महिलांनी तहसील कार्यालयावर केलेल्या हल्लाबोलमुळे अधोरेखित झाली. प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या वर्षी बोगस रेशनकार्डचा सुळसुळाट झाल्यामुळे उठलेले वादळ तर्कवितर्काच्या गर्तेत सापडून शमले होते. त्याचे स्मरण या निमित्ताने झाले.
तालुक्यात रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. त्याची दखल घेतली जात नव्हती. आज दुपारी टेम्पो भरून आलेल्या मांडवडच्या आदिवासी महिलांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून रेशनकार्डावर धान्य मिळावे, अशी मागणी केली. सदर कार्ड आम्ही तीन ते पाच हजार रुपये देऊन स्वस्त धान्य दुकानदार शकुंतला अहेर यांच्याकडून घेतले असल्याची माहिती महिलांनी दिली. कार्ड मिळण्यासाठी ‘वरच्या साहेबाला पैसे द्यावे लागतात’, असे अहेर यांनी सांगितल्याने गरीब असूनही पैसे गोळा करून कार्ड मिळविल्याचे महिलांचे म्हणणे होते. तरीसुद्धा गेली तीन वर्षे आम्हाला धान्य मिळत नसल्याची महिलांची तक्रार आहे. पैसे देऊन मिळालेल्या कार्डवर रॉकेल मिळणार नाही, असे धान्य दुकानदार अहेर यांनी सांगितल्याने या महिलांना संशय आला. पैसे दिले तर दारिद्र्यरेषेखालचे कार्ड मिळेल, नाही तर सर्वसाधारण कार्ड मिळेल असे सांगण्यात आल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
संतप्त महिला तहसीलमध्ये आल्यानंतर पुरवठा विभागात अधिकारी थोरात यांना भेटल्या. रेशनकार्ड दाखविल्यानंतर ‘ही माझीच सही आहे’ असे थोरात यांनी सांगितले. मात्र संबंधित दुकानदार कार्ड बोगस असल्याचे सांगून धान्य देत नाही, अशी तक्रार महिलांनी मांडली. तेव्हा थोरात यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला. दोन तास ठिय्या मांडून बसलेल्या महिलांची कोणीही दखल घेतली नाही. सामाजिक कार्यकर्ते दीपक काजळे यांनी महिलांची कैफियत ऐकत तहसीलदार सुदाम महाजन यांना ही माहिती दिली.
महिलांकडच्या कार्डवरील सही आपली नसून थोरात यांची असल्याचा खुलासा तहसीलदार महाजन यांनी केला. कार्डवर तहसीलदार यांची स्वाक्षरी असते. थोरात यांना स्वाक्षरी करण्याचा कोणताही अधिकार नाही. पूर्वीच्या तहसीलदारांनी तसा अधिकार आपणास दिला असल्याचे थोरात सांगतात. परंतु तसा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही, अशी माहिती तहसीलदार सुदाम महाजन यांनी यावेळी दिली. त्यामुळे तालुक्यात बोगस रेशनकार्ड विक्रीचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत
आहे.