रस्तालूट करणारे जेरबंद
By Admin | Updated: November 11, 2015 00:11 IST2015-11-11T00:11:33+5:302015-11-11T00:11:53+5:30
एमआयडीसी पोलीस : गस्तीपथकाची कामगिरी

रस्तालूट करणारे जेरबंद
सिन्नर: रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांची लूट करणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीपथकाने पाठलाग करून जेरबंद केले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गस्तीपथकाने ही कामगिरी केली. यातील फरार चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे.
मनेगाव येथील छायाचित्रकार गणेश मधुकर करगड हे गुरेवाडी येथील आॅर्डर पूर्ण करून रात्री साडेआठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने मनेगाव येथील आपल्या घराकडे निघाले होते. रस्त्यात अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. करगड यांना धाक दाखवून या तिघा चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १ हजार आठशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर चोरटे त्यांच्याकडील दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस हद्दीत कामगारांचे पगार व बोनसच्या पार्श्वभूमीवर कामगारांची होणारी लूटमार लक्षात घेता पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन गस्तीपथक तैनात करण्यात आले आहे. करगड यांना चोरट्यांनी लुटल्यानंतर ते काय करावे या विचारात असतानाच घटनास्थळी एमआयडीसी गस्ती पथकाचे वाहन पोहचले. पोलीस हवालदार गौरव सानप, दत्तू खतीले, प्रवीण मासळे यांनी करगड यांची विचारपूस केली. त्यांनी घडलेली आपबिती सांगताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पोलीस वाहनात बसवून घेतले. चोरटे पसार झाले त्या दिशेने पोलिसांच्या गस्तीपथकातील वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला.
नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ तीन चोरटे दुचाकीवरून पुढे जात असल्याचे करगड यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडविले. चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकी तेथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मदन मारुती पवार (३२) रा. खंबाळे हा संशयित चोरटा पोलिसांच्या ताब्यात सापडला. तर अन्य दोघेजण अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी पवार याच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अन्य त्याच्या एका साथीदाराला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याचे समजते.
याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक पुंडलीक सपकाळे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)