रब्बी गहू पीक स्पर्धेत घोडेवाडीचे जगन घोडे विभागात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 00:20 IST2021-07-03T23:09:01+5:302021-07-04T00:20:50+5:30

सर्वतीर्थ टाकेद : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रब्बी गहू पीक स्पर्धेत आदिवासी गटातून ग्रामपंचायत टाकेद बु. (घोडेवाडी) येथील ...

In the Rabbi Wheat Crop Competition, Ghodewadi's Jagan came first in the horse section | रब्बी गहू पीक स्पर्धेत घोडेवाडीचे जगन घोडे विभागात प्रथम

रब्बी हंगाम स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक विजेते शेतकरी जगन घोडे यांना नाशिक येथील कार्यक्रमात सन्मानपत्र प्रदान करताना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर. समवेत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी.

ठळक मुद्देआदिवासी गटात : इगतपुरी तालुक्यात कौतुक

सर्वतीर्थ टाकेद : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रब्बी गहू पीक स्पर्धेत आदिवासी गटातून ग्रामपंचायत टाकेद बु. (घोडेवाडी) येथील शेतकरी जगन्नाथ तुकाराम घोडे यांनी नाशिक विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याने इगतपुरी तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ रुरल टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट नाशिक येथील कृषी विभागाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते शेतकरी जगन घोडे यांना गौरविण्यात आले. पंचवीस हजार रुपये, सन्मानपत्र व प्रशस्तिपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. घोडे यांनी सन २०२० मध्ये कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त गहू पिकाचे उत्पादन घेतले. यात त्यांनी २१८९ या गहू पिकाच्या वाणाची लागवड केली होती. त्यांनी प्रतिहेक्टरी ५०,२५० किलो गव्हाचे उत्पादन घेतले. रासायनिक खतांचा संतुलित वापर करीत जमीन सुपीकता निर्देशांकानुसार आवश्यक तेवढ्याच रासायनिक खतांचा वापर केला. नैसर्गिक पद्धतीने बनविलेल्या निंबोळी अर्क आणि शेण खतांवर भर दिला. त्यामुळे गहू पीक स्पर्धेत हेक्टरी ५२ क्विंटल २० किलो एवढे उच्चांकी उत्पादन ते घेऊ शकले. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेता येते, असा आदर्श घोडे यांनी अन्य शेतकऱ्यांसमोर ठेवल्याने त्यांचे इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी आदींनी कौतुक केले. या यशात त्यांना तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी बी. के. गिते, मंडळ कृषी अधिकारी किशोर भरते, कृषी पर्यवेक्षक संजय पाटील, कृषीसेवक जयश्री गांगुर्डे, कृषी सहाय्यक किरण सोनवणे, ए.जी. राऊत आदींचे मार्गदर्शन लाभले.

गहू पीक स्पर्धेतील मानकरी १) महाराष्ट्रात प्रथम- विठ्ठल भीमा आवारी, साकूर २) विभागात प्रथम - जगन्नाथ तुकाराम घोडे, घोडेवाडी-टाकेद ३) तालुक्यात प्रथम - रामदास गभाले, मांजरगाव

 

Web Title: In the Rabbi Wheat Crop Competition, Ghodewadi's Jagan came first in the horse section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.