इंदिरानगर : पाणी येत नसेल, तर आंघोळीच्या गोळ्या घ्या, असा अजब सल्ला देणाऱ्या महापालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याला आमदारासमवेत पाहून संयमाचा बांध सुटलेल्या पोलीस वसाहतीतील महिलांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे आमदाराला निरुत्तर व्हावे लागले, तर नागरिकांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनाही काढता पाय घ्यावा लागला. परिणामी मूळ पाणीटंचाईचा प्रश्न मात्र तसाच अनिर्णीत राहिला. पाथर्डी वासननगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या पोलीस कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार सीमा हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सोमवारी या प्रश्नावर महापालिका आयुक्तांशी बोलणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महापालिकेचे संंबंधित पाणीपुरवठा अभियंत्यांशी त्रस्त नागरिकांनी संपर्क साधला असता त्यांनी पाणी नसेल, तर आंघोळीच्या गोळ्या घ्या, असा सल्ला दिल्याने नागरिक आणखीनच चिडले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी आमदार सीमा हिरे, महापालिकेचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार, कार्यकारी अभियंता एस. के. चव्हाणके, अभियंता संजीव बच्छाव यांनी पोलीस वसाहतीत जाऊन नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अभियंत्याने दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिल्यानंतर नागरिकांनी या पथकालाच घेराव घालून संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केल्याने अखेर आमदार हिरेंसह अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. (वार्ताहर)
प्रश्नांच्या भडिमाराने आमदार निरुत्तर
By admin | Updated: August 12, 2015 00:01 IST