वालदेवी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: May 20, 2016 00:04 IST2016-05-19T23:31:55+5:302016-05-20T00:04:25+5:30
प्रदूषणमुक्तीसाठी बैठक : सर्वांनी ताकदीने सहभागी होण्याचे आवाहन

वालदेवी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर
नाशिकरोड : गोदावरी नदीच्या पाठोपाठ आता वालदेवी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले आहे.
नाशिकरोड प्रभाग समिती कार्यालयात घोलप यांच्या अध्यक्षतेखाली वालदेवी नदी प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात गुरुवारी दुपारी बैठक झाली. बैठकीमध्ये वालदेवी नदीपात्र प्रदूषणमुक्त व स्वच्छ करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वालदेवी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे काम हाती घेण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी शिवसेनेने वालदेवी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत करत इतर पक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आदिंनादेखील सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. तर माजी नगरसेवक सत्यभामा गाडेकर यांनी रोकडोबावाडी ते रेल्वे पुलापर्यंत वालदेवी नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
वालदेवी प्रदूषणमुक्तीचा विषय गंभीर झाला असल्याने त्याबाबत मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करून मनपाची यंत्रसामग्री आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यार असल्याचे प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे यांनी सांगितले. बैठकीला सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, ललिता भालेराव, निशिकांत पगारे, उदय थोरात, मसूद जिलानी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)