मुकणेप्रश्नी शिवसेना आक्रमक
By Admin | Updated: October 14, 2015 23:27 IST2015-10-14T23:23:28+5:302015-10-14T23:27:29+5:30
महासभेत फेरप्रस्ताव : वादग्रस्त निविदा प्रक्रियेला हरकत

मुकणेप्रश्नी शिवसेना आक्रमक
नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या मुकणे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा फेरप्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शनिवारी (दि. १७) होणाऱ्या महासभेत मांडला जाणार असून निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसह त्रुटींबाबत शिवसेनेने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत विरोध दर्शविण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे, येत्या महासभेत मुकणेप्रश्नी सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची निविदा प्रक्रिया राबवून सदर काम एल अॅण्ड टी कंपनीला देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मात्र, सदर योजनेची निविदा प्रक्रिया राबविताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार आमदार बाळासाहेब सानप यांचेसह शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, त्यावेळचे मनपातील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार, शासनाच्या नगरविकास विभागाने सदर योजनेच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिल्याने महासभेत वाढीव खर्चाचा प्रस्ताव लटकला होता. दरम्यान, काही अटी-शर्तींवर मुकणेच्या निविदा प्रक्रियेवरील स्थगिती उठविली, परंतु गेल्या दोन महिन्यांत महासभेत फेरप्रस्ताव येऊ शकला नाही. आता शनिवारी (दि. १७) होणाऱ्या महासभेत प्रशासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आणि ३६ कोटींच्या अतिरिक्त खर्चाच्या मंजुरीसाठी फेरप्रस्ताव ठेवला आहे. परंतु, शिवसेनेने मुकणेप्रश्नी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली असून महासभेत सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला घेरण्याची तयारी चालविली आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले, शासनाने स्थगिती उठवताना ज्या अटी-शर्ती घातल्या आहेत त्यावर प्रशासनाने काय कार्यवाही केली, याचा जाब विचारला जाईल. सेनेचा विकासाला विरोध नाही परंतु ज्याठिकाणी मनपाच्या हिताविरोधी गोष्टी घडत असतील आणि महापालिकेला आर्थिक झळ पोहोचणार असेल तर त्याला विरोध केला जाईल. माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, शासनाने स्थगिती उठविताना जे मुद्दे मांडले तेच मुद्दे आमचेही आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निविदा समितीने निविदांची तपासणी केली आहे काय? तशी तपासणी केली असेल तर त्याचा अहवाल महासभेत मांडला पाहिजे. शिवसेनेची भूमिका महासभेतच मांडली जाईल, असेही बडगुजर यांनी सांगितले. मुकणे पाणीप्रश्नी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शनिवारची महासभा मुकणे प्रश्नावरच गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)