नववीसाठी दहावीच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका
By Admin | Updated: July 28, 2016 00:14 IST2016-07-28T00:09:13+5:302016-07-28T00:14:42+5:30
शासनाच्या विचाराधीन : मुख्याध्यापक संघाच्या सभेत चर्चा

नववीसाठी दहावीच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका
नाशिक : दहावी इयत्तेचा निकाल उंचावण्यासाठी अनेक शाळा विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करतात. त्यामुळे दहावीच्या तुलनेत नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेऊन नववीची परीक्षा दहावीच्या धर्तीवर राज्यभर एकच नमुना प्रश्नपत्रिका निश्चित करून घेण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. शिक्षणमंत्र्यांनी या निर्णयाची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी शिक्षणाधिकारी तथा संबंधित यंत्रणांच्या पदाधिकाऱ्यांची याविषयी कार्यशाळा पार पडली असून, याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणे अपेक्षित असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी वार्षिक नियोजन पूर्वतयारी बैठकीत या परीक्षेसाठी तत्पर राहण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली.
माध्यमिक शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात शिक्षणाधिकारी औताडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील अकराशे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी औताडे यांनी शैक्षणिक धोरणांमधील महत्त्वाच्या बदलांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नववीच्या परीक्षेसाठी दहावीप्रमाणेच राज्यभर एकच नमुना प्रश्नपत्रिका तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. शाळांना नववीची परीक्षा घ्यायची असली, तरी त्याची नमुना प्रश्नपत्रिका बोर्डाकडून तयार करून मिळेल. त्यामुळे राज्यभर एकाच वेळी ही परीक्षा घेण्याचे संकेत मिळाले आहेत. बोर्डाची ही परीक्षा होण्यापूर्वी शाळांना नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घ्यावी लागेल. याची अधिकृत तारीख शाळांना लवकरच कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारलिंक करण्यासाठी ४० विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून तहसीलदार कार्यालयास कळवावे. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करून ते खात्याशी जोडण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत आहे. नॅशनल मन्सिकम मेरीट शिष्यवृत्तीसाठी (एनएमएमएस) पात्र विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शुक्र वारी तालुकास्तरावर पाठविणे बंधनकारक असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. त्याप्रमाणे अनुदानित शाळेतील २० वर्षांपूर्वीचे साहित्य निर्लेखित करण्यासाठी २६ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. दि. २२ ते २७ आॅगस्ट दरम्यान इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्णातील २१० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ५ हजार रु पये वर्ग करण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड उपक्र मात सहभाग नोंदविणे बंधनकारक असून, ज्या तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांची नावे येतील, त्या शाळेत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)