दीड कोटींच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:29 IST2017-08-02T00:28:58+5:302017-08-02T00:29:11+5:30
कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले.

दीड कोटींच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह
नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्थायी समितीच्या सभेत तारांगण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देणेपूर्वी एक वर्षासाठी पूर्वीच्याच मक्तेदाराकडून काम करून घेण्याचा विषय चर्चेला आला असता, शशिकांत जाधव यांनी महापालिकेला या प्रकल्पापासून आजवर किती उत्पन्न मिळाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची सूचना प्रशासनाला केली.
यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी सन २००७ पासून सुरू झालेल्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, देखभाल-दुरुस्तीवर दोन कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी पीपीपी तत्त्वावर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी, मनपा कर्मचाºयांना रेनकोट देण्यासंबंधीचा विषय चर्चेला आला असता प्रवीण तिदमे यांनी पावसाळ्यातील दोन महिने संपल्यानंतर आता रेनकोट खरेदीची प्रक्रिया राबविली जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला.
पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया का राबविली नाही, याचा जाबही त्यांनी विचारला. यावेळी प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी गेल्या दीड वर्षांपासून सदरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत दोन ते तीन वेळा फेरनिविदाही काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापतींनी ठेका संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशित केले. दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर सूर्यकांत लवटे, जगदीश पाटील, मुशीर सय्यद यांनी प्रश्न उपस्थित केले. मुदत संपण्यापूर्वीच प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्तांचे असूनही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन अधिकाºयांकडून केले जात असल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी निवडणूक आचारसंहिता व उशिराने प्राप्त झालेले अंदाजपत्रक यामुळे प्रक्रियेला विलंब झाल्याचे स्पष्ट केले. त्यावर, सभापतींनी आवश्यक औषध खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करण्याचे सूचित केले. पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबद्दलही सूर्यकांत लवटे, सय्यद मुशीर यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्याबाबत पुढील सभेत सविस्तर अहवाल ठेवण्याचे आदेश सभापतींनी दिले. दरम्यान, मखमलाबाद शिवारात अमृत योजनेंतर्गत साकारण्यात येणाºया तवली अमृत वनोद्यानाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.