मोबदल्याचा प्रश्न कामगार आयुक्तालयात

By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T23:43:11+5:302014-07-30T00:18:40+5:30

महापालिका कामगार : उद्या पुन्हा सुनावणी

The question of compensation is in the Labor Commissionerate | मोबदल्याचा प्रश्न कामगार आयुक्तालयात

मोबदल्याचा प्रश्न कामगार आयुक्तालयात

नाशिक : मार्चअखेरीस मालमत्ताधारकांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी आणि विविध कामांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कराव्या लागणाऱ्या जादा कामाचा मोबदलाच न मिळाल्याने तो मिळण्याची केस थेट कामगार आयुक्तालयात गेली असून, ३१ रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याची सूचना प्रशासकीय उपआयुक्तांना करण्यात आली आहे.
महापालिकेत एलबीटी लागू झाल्यापासून उत्पन्न घटले आहे. उत्पन्न वाढण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असते. पालिकेला मिळणारे विविध कर हे त्यातील महत्त्वाचे उत्पन्न होय. त्याची वसुली करणे हेच महापालिकेसमोरील आव्हान असते. यासाठी कर्मचाऱ्यांना घरोघरी भेटी देत कर भरण्याचे आवाहनही करावे लागते. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करून त्यांना सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती केली जाते. दरवर्षी मार्च महिन्यात यासाठी अनेक विभागांतील कर्मचारी साप्ताहिक आणि शासकीय सुटी न घेता काम करीत असतात. त्यापोटी त्यांना जादा कामाचा मोबदला मिळावा हा त्यांचा हक्कअसून, महापालिकेने त्यांना दोन वर्षांपासून वंचित ठेवल्याचा आरोप सेवास्तंभ या कर्मचारी संघटनेने केला होता.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा संदर्भ देत सेवास्तंभ संघटनेने कामगार आयुक्तालयात धाव घेतली होती. त्याचा संदर्भ घेत कामगार उपआयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दि. २३ जून आणि १७ आॅगस्ट रोजी पाचारण केले होते. पहिल्या तारखेस सहायक उपआयुक्त नितीन नेरे उपस्थित होते. दुसऱ्या सुनावणीस मनपा उपआयुक्त गैरहजर राहिल्याने उद्या दि. ३१ रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे पालिकेला कळविण्यात आले आहे. या प्रकरणी सुनावणीसाठी प्रशासकीय उपआयुक्तांनी उपस्थित राहण्याची सूचना कामगार उपआयुक्तांनी केली आहे. आता तरी न्याय मिळेल, या अपेक्षेत कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The question of compensation is in the Labor Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.