कार्यपद्धतीवर सवाल : महासभेसह स्नेमके केले काय?
By Admin | Updated: July 10, 2016 00:13 IST2016-07-10T00:08:37+5:302016-07-10T00:13:01+5:30
आयुक्त गेडाम यांच्या बदलीनंतर रंगली चर्चा!थायी समितीच्या अधिकाराला दिले आव्हान

कार्यपद्धतीवर सवाल : महासभेसह स्नेमके केले काय?
धनंजय वाखारे : नाशिक
लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर वचक निर्माण केल्याबद्दल महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम एकीकडे कौतुकाचे धनी ठरत असतानाच गेल्या वीस महिन्यांच्या कारकीर्दीत शहरातील मूलभूत समस्यांसह विकासाच्या प्रकल्पांकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याची चर्चा आता जनमानसात होऊ लागली आहे. गेडाम यांची बदली झाल्यानंतर लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकारीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असून, त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. गेडाम यांनी गेल्या दीड वर्षात महासभेसह स्थायी समितीच्या अधिकाराला आव्हान देण्याचीच नीती अवलंबिल्याने महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अनेक ठराव विखंडनासाठी शासन दरबारी पाठविण्याचा विक्रमही गेडामांच्या नावे जमा झाला आहे.
डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाल्यानंतर शहरात तुरळक स्वरूपात पडसाद उमटले. सोशल मीडियावर गेडामांच्या कर्तव्यदक्षतेचे दाखले देणारे फॉरवर्डेड मेसेज पसरविले जात असतानाच गेडाम यांच्या वीस महिन्यांच्या कारकीर्दीचा पंचनामा करणारेही संदेश फिरत आहेत. गेडाम यांच्या कारकीर्दीत शहरात एकही लक्षात राहिल असा प्रकल्प झाला नसल्याचा दावा केला जात असून, प्रभागातील विकासकामे ठप्प झाल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याचा नुसताच आभास निर्माण केला गेला. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निधीतून शहरात सिंहस्थाची अनेक कामे उभी राहिली, त्यात गेडामांचे कर्तृत्व काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कायम विविध न्यायालयीन खटल्यांच्या सुनावणीसाठी जाणाऱ्या गेडामांची अनुपस्थितीही महापालिकेच्या कामकाजाला खीळ घालणारी ठरल्याचीही चर्चा रंगली आहे.